पडीक जागांच्या स्वच्छतेसाठी दोन कोटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

'पीएससीडीसीएल' कंपनीसाठी आयसीसी टॉवरमध्ये जागा

'पीएससीडीसीएल' कंपनीसाठी आयसीसी टॉवरमध्ये जागा
पुणे - 'पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.'या कंपनीच्या कार्यालयासाठी सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमधील महापालिकेची जागा देण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजूर झाला. पुढील तीन वर्षांसाठी ही जागा देण्यात आली आहे. दरम्यान, औंध, बाणेर, बालेवाडी या भागातील पडीक जागांची साफसफाई करण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली.

आयसीसी टॉवर्समध्ये महापालिकेच्या मालकीची जागा असून, त्यापैकी काही जागा कंपनीच्या कार्यालयासाठी देण्याचा ठराव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतंर्गत निवड झालेल्या औंध, बाणेर, बालेवाडी या भागाची निवड करण्यात आली आहे. या भागातील पडीक जागांची स्वच्छता करण्याचे काम स्वतंत्र यंत्रणेकडे देण्यात येणार आहे.

केवळ दोन प्रभागांमधील जागा असून, त्यातही काही जागा खासगी मालकीच्या आहेत. तरीही या जागेच्या साफसफाईसाठी दोन कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याला मंजुरी देण्यात आली.

कचऱ्यासाठी सल्लागार कंपनीची नेमणूक
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला साह्य करण्यासाठी "अर्नेस्ट अँड यंग' या सल्लागार कंपनीची नेमणूक करण्याचा ठरावही बैठकीत या वेळी मंजूर केला. त्यासाठी या कंपनीला एक कोटी 98 लाख रुपये देण्यात येणार आहेत. या कंपनीच्या माध्यमातून "सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट', "प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट '"सीएनडी मॅनेजमेंट' आदी प्रकल्प कार्यान्वित करण्याबरोबरच शहरातील कचऱ्याची मासिक पाहणी, स्वच्छ सर्वेक्षणाबाबतची माहिती संकलित करण्यास साह्य ही कामे करून घेण्यात येणार आहेत.

एलईडी स्क्रिनसाठीचे खांब काढणार
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पदपथांवर एका कंपनीने "एलईडी स्क्रिन'साठी उभारलेले खांब काढून टाकण्याचे महापालिका प्रशासनाने मान्य केले. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता हे खांब उभारण्यात आल्याचे आढळून आले होते. या खांबावर "एलईडी स्क्रिन' लावून जाहिराती करण्यात येत आहेत. मात्र, या खाबांचा व्यावसायिक कारणासाठी वापर होण्याची शक्‍यता असल्याचे मत अविनाश बागवे यांनी बैठकीत मांडला. त्यावर खांब काढण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.