महापालिकेच्या जागांचे 22 कोटी भाडे थकले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

पुणे - महापालिकेच्या मालकीच्या सदनिका, व्यावसायिक जागा आणि मोकळ्या जागांचे 22 कोटी रुपये भाडे थकल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. थकबाकीदारांविरोधात कारवाई करून थकबाकी वसूल करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केली आहे.

महापालिकेच्या सदनिका, व्यावसायिक आणि मोकळ्या जागा भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. मात्र, काही भाडेकरू वर्षानुवर्षे भाडे देत नसल्याचे आढळले असून, थकबाकीचा हा आकडा 22 कोटी रुपये इतका आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी मिळकतधारकांच्या घरासमोर महापालिका प्रशासनातर्फे "बॅण्ड' वाजविला जातो तसेच, मिळकतींना टाळे ठोकण्याची कारवाई होते. मग, महापालिकेच्या जागांचे भाडे वसूल का केले जात नाही, असा प्रश्‍न मंचाचे विवेक वेलणकर यांनी विचारला.

महापालिकेच्या व्यावसायिक, मोकळ्या जागा आणि सदनिकांचे अनुक्रमे 12, 8 आणि 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक भाडे थकले आहे, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'महापालिकेच्या ज्या मिळकतींचे भाडे थकले आहे. त्याची चौकशी करून संबंधित भाडेकरूंकडील थकबाकी वसूल करण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाबरोबर चर्चा करून कार्यवाही केली जाईल.''