चार दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकाचा "आवाज'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

पुणे - सार्वजनिक गणेशोत्सवासाठी शासनाने 26, 29, 31 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबर असे चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरासाठी परवानगी दिली आहे. याशिवाय 4 सप्टेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देण्याची विनंती जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडे केली आहे. या एका दिवसास परवानगी मिळाल्यास गणेशोत्सव काळात पाच दिवस रात्री बारापर्यंत सार्वजनिक गणशोत्सव मंडळांना ध्वनिक्षेपक सुरू ठेवता येणार आहे.

ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर रात्री बारा वाजेपर्यंत करण्यासाठी शासनाने वर्षभरातील 15 दिवस निश्‍चित केले आहे. यातील चार दिवस हे गणेशोत्सवासाठी आहेत. शासनाच्या आदेशानुसार गणेशोत्सवातील 26 ऑगस्ट (दुसरा दिवस), 29 ऑगस्ट (पाचवा दिवस), 31 ऑगस्ट (गौरी विसर्जन) आणि 5 सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) असे चार दिवस निश्‍चित केले आहेत.

जिल्ह्यातील गणेशोत्सव नियोजन आणि कायदा सुव्यवस्थेसंबधी जिल्हाधिकारी कार्यालयात 26 जुलैला बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवासाठी शासनाने निश्‍चित केलेल्या चार दिवसांव्यतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील दोन दिवसांपैकी एक दिवस गणेशोत्सवासाठी निश्‍चित करण्याचे अधिकार देण्यात आले. त्यानुसार सार्वजनिक गणपती व आरास पाहण्यासाठी शेवटच्या चार दिवसांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या पार्श्‍वभूमीवर 4 सप्टेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याकरिता परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पर्यावरण विभागाच्या संचालकांकडे केली आहे. तसेच, याबाबतचे आदेश काढण्याची विनंतीही पर्यावरण विभागाकडे करण्यात आली आहे.