‘आधार’ मिळेना! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

शहरात १७० ठिकाणी आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्याची यादी ‘यूआयडी’कडे पाठविण्यात आली आहे. त्यापैकी त्यांनी सत्तर ठिकाणी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. उर्वरित यादीस अद्याप मान्यता दिलेली नाही. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. लवकरच त्यास मान्यता मिळेल आणि आधार नोंदणी केंद्रांची संख्या वाढेल.
- सौरभ राव, जिल्हाधिकारी 

पुणे - एकीकडे आधार कार्डातील दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत असताना, दुसरीकडे मात्र केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या आधार (यूआयडी) विभागातील अधिकाऱ्यांना वेळ नसल्याची माहिती समोर आली आहे. आधार नोंदणी केंद्रांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने विभागाकडे पाठवून महिना होत आला, अद्यापही त्यास या विभागाकडून मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे शहरात पुरेसे केंद्र सुरू होऊ शकलेली नाहीत.

केंद्र व राज्य सरकारने विविध कामांसाठी आधार कार्ड जोडणे बंधनकारक केले आहे. शहरात आधार नोंदणी झालेल्या नागरिकांची संख्या मोठी असली, तरी कार्डातील नावात, पत्ता यामध्ये चुका झालेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, आधार कार्डातील चुका दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना पुन्हा या केंद्रांचा आधार घ्यावा लागत आहे; परंतु शहरात पुरेशी केंद्र नसल्यामुळे आणि ज्या ठिकाणी केंद्र सुरू आहेत, त्या ठिकाणी दिवसभरात वीस नागरिकांच्या कार्डातील दुरुस्तीचे काम केले जात नाही. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

या संदर्भात माहिती घेतल्यानंतर सरकारी कार्यालयातच आधार नोंदणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी यापूर्वी काम दिलेल्या कंपनीकडून सर्व आधार नोंदणी मशिन काढून घेण्यात आली आहेत. ती घेतल्यानंतर त्यामध्ये नवीन सॉफ्टवेअर भरणे, ज्या खासगी एजन्सी चालकांनी सरकारी कार्यालयांच्या आवारात नोंदणीचे काम करण्याची तयारी दर्शविली आहे, अशा एजन्सीला मान्यता देणे यांची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली. त्यास मान्यता मिळावी, यासाठी १८० जणांची यादी आधार विभागाकडे पाठविली आहे. मात्र, महिना होत आला, तरीदेखील या यादीला अद्याप मान्यता मिळालेली नाही. पहिल्या टप्प्यात पुणे शहर व जिल्ह्यात मिळून सत्तर एजन्सीला मान्यता मिळाली आहे. त्यावरच सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. परिणामी, केंद्रांची संख्या अपुरी असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: pune news aadhar card