आधार सेवा अद्याप 'विस्कळित'

आधार सेवा अद्याप 'विस्कळित'

पुणे - आधारची संगणकीकृत माहिती (डेटा) साठवून ठेवण्यासाठी असलेल्या मुख्य सर्व्हर बंद पडत असल्यामुळे शहर आणि उपनगरातील आधार नोंदणीच्या अधिकृत केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. वीस टोकनचीच मर्यादा असल्यामुळे पहाटेपासून टोकन घेण्यासाठी महा ई सेवा केंद्रांवर रांग लागत आहे. परंतु, टोकन घेऊनही हाताचे ठसे, डोळ्याचे स्कॅनिंग होत नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सेतू केंद्र, महा ई सेवा केंद्रांसह महापालिकेची सर्व क्षेत्रीय कार्यालये, टपाल कार्यालयांसह बॅंका आणि बीएसएनएल कार्यालयांमध्ये आधार नोंदणी केंद्रे सुरू आहेत. परंतु, सर्व्हरबाबत तांत्रिक समस्येमुळे होणारा विलंब, हाताचे ठसे व डोळ्याचे स्कॅनिंग होत नसल्यामुळे अडचणी येत आहे. या तांत्रिक अडचणींमुळे आधार नोंदणी व ‘अपडेट क्‍लाएंट लाइफ’ (यूसीएल) मशिनद्वारे माहिती अद्ययावतीकरणामध्ये अडचणी येत आहेत.

याबाबत घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयात आलेल्या अनुराधा देशपांडे म्हणाल्या, ‘‘टोकनसाठी पहाटेपासून रांग लावावी लागते. टोकन संख्या आणि आधार सेंटर वाढवले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांचा विचार झाला पाहिजे, मशिन अनेकवेळा बंद पडते.’’

अभिजित जिवाजी म्हणाले, ‘‘गेली अनेक दिवस पहाटे पाचपासून टोकन रोज येऊन थांबतो आहे. एका केंद्रावर केवळ दहाच टोकन दिले जातात. आज सलग चौथा दिवस आहे, मशिन बंद पडत आहे. तर हाताचे ठसे आणि डोळ्याचे स्कॅनिंग होत नाही.’’

शिवाजीनगरचे रहिवासी अमर काळे म्हणाले, ‘‘मुलीच्या ॲडमिशनसाठी आधार काढत आहे. चार दिवसांपासून सतत येत आहे, पण टोकन मिळत नाही.  सकाळची कामे सोडून रोज रांगेत उभे राहावे लागते. यावर प्रशासनाने उपाययोजना केली पाहिजे.’’

 विश्रांतवाडी येथील रहिवासी सुनीता भोसले म्हणाल्या, ‘‘गेल्या आठ दिवसांपासून चकरा मारते आहे, पण टोकन मिळत नाही. विश्रांतवाडीत केंद्र नसल्यामुळे टोकन घेण्यासाठी शिवाजीनगरला रोज पहाटे येणे शक्‍य नाही होत नाही.’’

टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात आलेल्या ज्येष्ठ नागरिक प्रमिला देसाई म्हणाल्या, ‘‘आधार नोंदणीसाठी टोकन मिळूनही हाताच्या बोटांचे ठसे येत नाहीत. आधार लिंक नसल्यामुळे बॅंक खाते बंद झाले आहे. आधार  केंद्रे आणि टोकन संख्या वाढवली पाहिजे.’’

‘आधार’ नोंदणीतील समस्या
 ज्येष्ठ नागरिकांचे हाताचे ठसे व डोळ्याचे स्कॅनिंग न होणे 
 टोकन काढण्यासाठी पहाटेपासून रांगा
 टोकन मिळूनही नोंदणी यंत्रांमध्ये बिघाड येत असल्यामुळे होणारा विलंब
 काही महा ई सेवा केंद्रांवर आधार सेवा बंद असल्याने नागरिकांचे हाल
 शालेय प्रवेश आणि महाविद्यालयात प्रवेशासाठी आधारची गरज

आधार नोंदणीमध्ये घेतलेल्या बायोमेट्रिक नोंदींची संगणकीकृत माहिती (डाटा) ‘सेक्‍युअर्ड फाइल ट्रान्स्फर प्रोटोकॉल’(एसएफटीपी) सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे आधारचा डाटा साठविला जात नव्हता. त्यामुळे आधार नोंदणी व माहिती अद्ययावतीकरणामध्ये अडचणी येत होत्या. तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून आधार नोंदणी आणि यूसीएल कीट सेवा पूर्वपदावर येत आहे.
- विकास भालेराव, तहसीलदार तथा ‘आधार’ नोडल अधिकारी

शहरातील खालील बॅंकामध्ये  ‘आधार’ केंद्र सुरू आहे
स्टेट बॅंक ऑफ इंडिया (लिंकरस्ता चिंचवड, वारजे माळवाडी), आयडीबीआय (औंध, ज्ञानेश्‍वर पादुका चौक, खराडी) कोटक महिंद्रा (भांडारकर रस्ता, कल्याणीनगर, एम्पायर इस्टेट चिंचवड), सिंडिकेट बॅंक (गुलटेकडी), डीसीबी बॅंक (पुणे स्टेशन), बॅंक ऑफ इंडिया (रास्ता पेठ), युनियन बॅंक (येरवडा), इंडियन बॅंक (वानवडी), ॲक्‍सिस बॅंक (कोरेगाव पार्क, औंध, सिंहगड रस्ता, मुंढवा, कोंढवा खुर्द, मगरपट्टा, बोट क्‍लब रस्ता)  एचडीएफसी बॅंक (फर्ग्युसन कॉलेज रस्ता), बंधन बॅंक (औंध). सिटी पोस्ट बुधवार पेठ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com