‘आधार’च्या सक्तीमुळे नागरिकांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पुणे - केंद्र आणि राज्य सरकाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. परंतु आधार नोंदणीसाठी सक्षम यंत्रणा उभी करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे नोंदणीप्रक्रिया तातडीने सक्षम करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने दिला आहे.

सरचिटणीस अमित बागूल म्हणाले,‘‘ बॅंक खात्याला आधारजोडणी करणे, प्राप्तिकर विवरण (आयटी रिटर्न) भरणे, शाळेत आधार क्रमांक, मोबाईल क्रमांकाला आधारजोडणी करणे, या बरोबरच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही सरकारने आधार क्रमांक सक्तीचे केले आहे. मात्र त्यासाठी आवश्‍यक आधार नोंदणी केंद्रे आणि पर्यायी व्यवस्थाच केली नाही. आधार नोंदणीची व्यवस्था सक्षम होत नाही तोपर्यंत नागरिकांना विविध कामांसाठी आधार क्रमांक सक्तीचा करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.’’

आधी सेवा सक्षम करा
शहरात जी आधार केंद्रे सुरू आहेत ती देखील ठप्प आहेत किंवा संथगतीने कार्यरत आहेत. त्यात भर म्हणजे हॉस्पिटलमध्येही उपचारासाठी आता ‘आधार’ सक्तीचे केले आहे. परिणामी, रुग्णांसह नातेवाइकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.