आधारकार्डमधील दुरुस्त्या टपाल कार्यालयांत होणार !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मुख्य टपाल कार्यालयात आधार कार्ड केंद्राचे खासदार अनिल शिरोळे आणि जनरल पोस्टमास्तर गणेश सावळेश्वर यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : युनिक आयडेंटिफिकेशन एथोरिटी ऑफ इंडिया (युडीएआय) कडून खासगी संस्थांकडून आधार कार्ड मधील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी बदल करून देण्यात येते. परंतु नागरिकांची वाढती गरज लक्षात घेऊन भारत सरकारने सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये आधार अद्ययावत केंद्राची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार पुणे जनरल टपाल मुख्य कार्यालयामध्ये पहिल्या आधार अद्ययावत केंद्राचे उद्घाटन गुरुवारी सकाळी करण्यात आले.

यावेळी खासदार अनिल शिरोळे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तर महाराष्ट्र मंडल मुख्य पोस्टमास्तर जनरल एच.सी. अग्रवाल, पुण्याचे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वर आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पोस्ट खात्याच्या २० जणांना युडीएआय कडुन विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे सर्वजण ४९७ पोस्ट कार्यालयांतील कर्मचा-यांना आधार अद्ययावत कसे करावे याचे प्रशिक्षण देणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्येे पुणे विभागातील २० पोस्ट कार्यालयांमध्ये आधार अद्ययावत केंद्रे स्थापन केले जाणार आहेत. त्यानंतर १० जुलैपासून पुण्यासह अन्य चार जिल्ह्यांमधील ४९७ टपाल कार्यालयांमध्ये ही केंद्रे सुरू केली जातील अशी माहिती पोस्टमास्तर जनरल सावळेश्वर यांनी यावेळी दिली.