आहुप्यातील निसर्ग सौंदर्याचा खजिना खुला!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

तंबूत निवासाची सोय
भीमाशंकर येथे दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक येतात. त्यातील हजारो पर्यटक गेल्या काही वर्षांपासून आहुपे येथे भेट देतात, परंतु त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था नव्हती. मात्र आता वन विभागाने आहुप्याजवळ तंबूत निवासाची सोय केली आहे. राज्य सरकारने ‘इको टुरिझम’साठी आलेल्या निधीतून आहुप्यातील जंगलात काही भागात तंबू, निसर्ग परिचय केंद्र, निरीक्षण मनोरे, सुरक्षा भिंत बांधण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती आहुपे ग्राम परिसर विकास समितीचे अतुल वाघोले यांनी दिली.

पुणे - पश्‍चिम घाटाच्या कुशीत... अन्‌ भीमाशंकर अभयारण्याजवळ असणारी आहुपेमधील देवराई आणि त्यातील औषधी वनस्पतींचा खजिना, सोनकीने तेथे फुलणारे पठार... कोकण कड्याच्या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद हौशी पर्यटकांना लुटता येण्यासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटन विकास उपक्रमांतर्गत आहुपे परिसराचा विकास केला आहे. त्यामुळे आता नागरिकांना पर्यटनाचा नवा पर्याय खुला झाला आहे.

राज्यातील बहुतांश अभयारण्यांमध्ये वन विभागातर्फे निसर्ग पर्यटन ही संकल्पना राबविण्यात येत आहे. वनक्षेत्रालगत राहणाऱ्या लोकांच्या सहभागातून जंगलांचे संरक्षण आणि त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी वन विभाग निसर्ग पर्यटन योजनेत स्थानिकांना सहभागी करून घेत आहे. पुणे वन विभागही आहुपे वनक्षेत्रात ‘निसर्ग पर्यटन’ ही योजना राबवीत आहे. पर्यटकांची सुरक्षा आणि त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था येथे केली आहे. त्यामुळे पर्यटकांना या जंगलात तंबूत राहण्याचा आणि मनसोक्त भटकंतीचा आनंद लुटता येणार आहे. पर्यटनाच्या नियोजनासाठी वन विभागाने ग्रामस्थांच्या सहकार्याने ‘आहुपे ग्राम परिसर विकास समिती’ची स्थापना केली असून याद्वारे पर्यटन आणि पर्यटकांचे व्यवस्थापन आणि नियोजनाची जबाबदारी सांभाळली जात आहे, असे वन विभागातर्फे सांगण्यात आले.