अपघातांचे सत्र कधी थांबणार?

शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

पुणे - शहरातील कोथरूड परिसर, पौड रस्ता, सिंहगड रस्ता, केशवनगर, मुंढवा चौक आणि रस्त्यांवर सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने अपुऱ्या पायाभूत सुविधा, पादचाऱ्यांसाठी सिग्नलचा अभाव आणि खड्डे यामुळे अपघात होत आहेत. शहरातील अपघातांचे हे सत्र कधी थांबणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

पुणे - शहरातील कोथरूड परिसर, पौड रस्ता, सिंहगड रस्ता, केशवनगर, मुंढवा चौक आणि रस्त्यांवर सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने अपुऱ्या पायाभूत सुविधा, पादचाऱ्यांसाठी सिग्नलचा अभाव आणि खड्डे यामुळे अपघात होत आहेत. शहरातील अपघातांचे हे सत्र कधी थांबणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

कोथरूड 
हुतात्मा राजगुरू चौकात (करिष्मा चौक) दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. या ठिकाणी सिग्नल, सूचनाफलक, सिग्नलजवळ थांबापट्टी व्यवस्थित नाहीत. झाला सोसायटीकडून कर्वेनगरकडे वळण्यासाठी सिग्नल केवळ दहा सेकंदाचा आहे. त्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना अपघाताला सामोरे जावे लागते. कॅनॉल रस्ता चौकात सिग्नल आहे. परंतु, येथे झेब्रा क्रॉसिंग पट्ट्या आखलेल्या नाहीत. 

उपाययोजना
कॅनॉल रस्ता चौकात सिग्नलजवळ झेब्रा क्रॉसिंग आखावे
राजगुरू चौक आणि करिष्मा सोसायटी कॅनॉल रस्ता चौकातील सिग्नलची सांगड घालावी
झाला सोसायटीकडून येणाऱ्या वाहनांसाठी सिग्नलची वेळ वाढवावी 
सीसीटीव्ही कार्यान्वित करावी
वाहतूक पोलिसांच्या संख्येत वाढ करावी  

पौड रस्ता
चांदणी चौक ते पीएमपी डेपो चौकापर्यंतचा तीव्र उतार अपघातांना कारणीभूत ठरत आहे. पीएमपी डेपो चौकातील वाहतुकीमुळे अपघात होत आहेत.
त्रुटी 
चांदणी चौक ते पीएमपी डेपो चौकादरम्यान तीव्र उतार
रस्त्यालगत थांबणारी वाहने, पदपथावर वाहनांचे पार्किंग
पीएमपी डेपो चौकात पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा नाही  
उपाययोजना
चांदणी चौक उड्डाण पूल आराखड्यात पीएमपी डेपो चौकापर्यंतचा समावेश व्हावा
तीव्र उतार कमी करण्याची गरज
उजव्या आणि डाव्या भुसारी कॉलनीकडे वळणाऱ्या वाहनांसाठी चौकात सूचनाफलक बसवावेत
तीव्र उतारावर गतिरोधक बसवावेत
पीएमपी डेपो चौकात पादचारी भुयारी मार्ग अथवा उड्डाण पूल उभारावा

सिंहगड रस्ता 
सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी, वडगाव पुलाखाली, माणिकबाग, विश्रांतीनगर, गणेशमळा, पानमळा चौकात अपघात होत आहेत. या ठिकाणी प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. 

किरकटवाडी : 
त्रुटी
किरकटवाडी चौकात नेहमीच छोटे-मोठे अपघात
खराब रस्ता, रस्त्यावर कचऱ्याचे ढीग, अतिक्रमण 

उपाययोजना  
वाहतुकीचे नियोजन, कचऱ्याचे नियोजन, रस्ते दुरुस्ती करावी 

वडगाव पुलाखालील चौक
त्रुटी

सिग्नल पूर्णवेळ सुरू नसतात  
महामार्गालगत सेवा रस्त्यांची दुरवस्था, अतिक्रमण
रस्त्यावरच रिक्षा, पॅगो, इतर मालवाहू वाहने उभी राहतात  

उपाययोजना : 
समांतर पार्किंग बंद करावी
अतिक्रमणे काढणे, सेवा रस्त्याचे नियोजन करावे

माणिकबाग चौक
त्रुटी : 

माणिकबाग येथील रस्त्यावर खड्डे  
ओढ्याचे पाणी रस्त्यावर साचते 

उपाययोजना :  
सांडपाणी वाहिनी कायमस्वरूपी दुरुस्त करावी
माणिकबाग चौकातील खड्डे बुजवावेत
अतिक्रमण हटवावे

सनसिटी रस्ता : 
सनसिटीच्या पुढे महामार्गाला जोडणाऱ्या सेवा रस्त्यावर अपघातांची संख्या मोठी आहे. या परिसरात साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांना अगोदर मुंबईच्या दिशेला वळून पुन्हा डावीकडे वळून साताऱ्याच्या दिशेने जावे लागते. या भागात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघात होतात. 

उपाययोजना -  
या भागात दोन ठिकाणी रस्ता खुला केल्यास मुंबईहून येणारी वाहने डाव्या बाजूने आत येतील. तसेच, साताऱ्याकडे जाणारी वाहने डाव्या बाजूनेच पुढे जाऊन महामार्गाला लागतील.  

आणखी किती पादचाऱ्यांचे बळी घेणार
मुंढवा येथील महात्मा फुले चौकात भरधाव वाहने येतात. येथील सिग्नलमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. या चौक परिसरात गेल्या काही महिन्यांत अपघातात आठ जणांना जीव गमवावा लागला आहे.  

उपाययोजना - 
रस्ता रुंदीकरण करावे 
पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नलमध्ये व्यवस्था करावी 
केशवनगर मुंढवा मार्गावर भुयारी मार्ग व्हावा
वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी 

केशवनगर रस्ता 
महापालिकेत समाविष्ट झालेल्या केशवनगरमधील मांजरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्टॉल्स, पथारी व्यावसायिक आणि भरधाव वाहनांमुळे येथील वाहतूक धोकादायक बनली आहे. 

उपाययोजना
हातगाडी, पथारीवाल्यांचे अतिक्रमण हटवावे 
रस्त्यावरील खड्डे बुजवावेत
(समाप्त)

Web Title: pune news accident issue