मंचर जवळ भीषण अपघातात बांधकाम व्यावसायिकासह मित्र ठार

मंचर जवळ भीषण अपघातात बांधकाम व्यावसायिकासह मित्र ठार

मंचर (पुणे) : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ-अवसरी घाटानजीक तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (ता. १५) रात्री उशिरा माल ट्रकची कारला धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात मंचर येथील बांधकाम व्यावसायिक कालिदास शिवराम मोरडे (वय २९) व त्यांचा मित्र अजिंक्य अंकुश बागल (वय २५, दोघे रा. मंचर) यांचा मृत्यू झाला. आज (गुरुवार) सकाळी मंचर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जन समुदाय उपस्थित होता.

तांबडे मळा येथे रस्त्याला लागूनच पेट्रोल पंप आहे. मारुती गाडीत (एम. एच. ४ बी. डब्लू. २५२८) पेट्रोल भरून मोरडे व बागल मंचर कडे निघाले होते. राजगुरुनगरच्या दिशेने भरधाव आलेल्या ट्रकने (आर. जे. ११. जी ए ५४०४) मारुती गाडीला पाठीमागच्या बाजूला जोरात धडक दिली. ट्रक बरोबर २०० फुट मारुती गाडी फरपटत गेली. त्यावेळी पुण्याहून मंचरला येत असलेले प्रसाद बाळासाहेब मोरडे व आकाश अविनाश डावखरे यांनी अपघात पहिला. गंभीर दोन्ही जखमींना प्रसाद यांनी ओळखले. मारुती गाडीचे दरवाजे उघडत नव्हते. अन्य नागरिकांच्या मदतीने प्रयत्नाची पराकाष्टा केल्यानंतर व दरवाजे तोडल्यानंतर प्रथम कालिदास मोरडे यांना गाडीच्या बाहेर काढाले. रुग्णवाहिकेतून त्यांना मंचर येथील खासगी हॉस्पिटल मध्ये नेले. दुसऱया रुग्णवाहिकेतून बागल यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेले. दोन्ही जखमींची तपासणी करण्यापूर्वीच ते मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्रसाद मोरडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस हवालदार सागर गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला आहे. मंचर पोलिसांनी अपघाताची माहिती न देता पळून जाणे व दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा ट्रक चालकाच्या विरोधात दाखल केला आहे. ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.  

दरम्यान, कालिदास मोरडे हे अभियंता होते. बांधकाम क्षेत्रात त्यांनी चांगला जम बसविला होता. अजिंक्य बागल यांचे वाहने स्वच्छ करण्याचे सेवा केंद्र (सर्विस स्टेशन) होते. दोघांचाही मंचर शहरात दांडगा जनसंपर्क होता. मोरडे यांचे सामाजिक क्षेत्रात योगदान होते. राजगुरुनगर येथे सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमाहून ते मंचरला येत होते. गाडीला पेट्रोल भरून रस्त्यावर आल्यानंतर त्यांच्यावर काळाने झडप घातली. मोरडे यांच्या मागे आई, वडील, भाऊ, बहिण व बागल यांच्या मागे पत्नी, दोन मुली, आई-वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. घडलेल्या दुर्देवी अपघातामुळे नागरिक हळहळ व्यक्त करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com