जाहिरातसुद्धा ‘व्हायरल’ झाली पाहिजे - पीयूष पांडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

पुणे - ‘‘एका ठिकाणी बसून नवनव्या कल्पना मिळणार नाहीत. त्यामुळे जाहिरात तयार करणाऱ्यांनी डोळे उघडे ठेवून देश फिरायला हवा. सर्व स्तरातील लोकांमध्ये मिसळायला हवे. सर्वसामान्यांची भाषा, त्यांचे म्हणणे समजून घ्यायला हवे. तरच उत्तम जाहिरात बनवता येते आणि ती जाहिरात काही क्षणात ‘व्हायरल’ही होते,’’ अशा शब्दांत जाहिरात क्षेत्रात ‘करिअर’करू पाहणाऱ्या नव्या पिढीशी संवाद साधत होते ‘ॲडगुरू’ पीयूष पांडे.

‘अब की बार, मोदी सरकार’ या जाहिरातीमुळे नव्याने चर्चेत आलेले पीयूष पांडे यांच्या ‘पांडेमोनियम’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रसाद नामजोशी यांनी ‘पांडेपुराण’ या नावाने केला आहे. त्याचे प्रकाशन पांडे यांच्याच हस्ते झाले. या वेळी मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, आशिष पाटकर उपस्थित होते. प्रकाशन सोहळ्यानंतर सुधीर गाडगीळ यांनी पांडे यांच्याशी संवाद साधला.

पांडे म्हणाले, ‘‘कुठल्याही वस्तूची जाहिरात तयार करताना त्यात भावना उतरली पाहिजे. त्यातून मिळणारी माहिती जीवनाचा एक भाग आहे, असे वाटले पाहिजे. अशीच जाहिरात समोरच्यांच्या हृदयाला स्पर्श करते. खरतर जाहिरात ही क्रिकेट मॅच सारखी असते. एकट्याच्या बळावर ती तयार होत नाही. लेखक, कॅमेरामन, संगीतकार, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ती साकारते. बदलत्या काळानुसार माध्यमेही बदलत आहेत. असे असले तरी जाहिरातींचे दूरचित्रवाणीवरील स्थान अजूनही भक्कम आहे. ते आपल्याला नाकारता येणार नाही.’’

घर हे ‘क्रिएटिव्ह फॅक्‍टरी’च
पीयूष पांडे म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांना कविता करण्याचा छंद होता. आई उत्तम वाचक होती. हिंदी साहित्य वाचायची. बहिणींना संगीतात रुची आहे. त्या उत्तम गातात. त्यामुळे मला माझे घर हे ‘क्रिएटिव्ह फॅक्‍टरी’च वाटते. घरात केवळ मी एकटाच क्रिकेटप्रेमी होतो. रणजी सामनेही खेळलो आहे; पण पुढे हे क्षेत्र सोडून जाहिरातीच्या क्षेत्रात रमलो. घरातील ‘क्रिएटिव्ह’ वातावरणाचा माझ्या जडण-घडणीत मोलाचा वाटा आहे.’’