'आदिवासींमुळेच जगण्याचा अर्थ समजला'

'आदिवासींमुळेच जगण्याचा अर्थ समजला'

पुणे - ""आदिवासींमध्ये प्रचंड आत्मविश्‍वास असल्याने कितीही प्रतिकूल परिस्थितीत ते आत्महत्येचा पर्याय स्वीकारत नाहीत. मुलगी कधीही गर्भात मारली जात नाहीच, उलट सहा-सात मुलानंतरही मुलीचा जन्म होण्यासाठी वाट पाहिली जाते. हुंड्यासाठी महिलेचा बळी घेतला जात नाही, तर मुलालाच हुंडा द्यावा लागतो. तिनं कमावलेल्या पैशावर किंवा संपत्तीवर कोणीही हक्क गाजवत नाही. त्या भागातील "स्त्री'मध्ये कमालीची निर्भयता आहे. अशिक्षित समाजात असलेली ही प्रगल्भता थक्क करणारी आहे,'' अशा शब्दांत भावना व्यक्त करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता कोल्हे यांनी आदिवासींमुळेच जगण्याचा खरा अर्थ कळल्याचे सांगितले. 

"सकाळ साप्ताहिका'च्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. कोल्हे यांचे "समाजसेवेचे व्रत' विषयावर व्याख्यान झाले. या वेळी "सकाळ'चे मुख्य संपादक श्रीराम पवार, "सकाळ'च्या पुणे आवृत्तीचे संपादक मल्हार अरणकल्ले, "सकाळ'चे संचालक (ऑपरेशन्स) भाऊसाहेब पाटील, "सकाळ साप्ताहिका'च्या सहसंपादक ऋता बावडेकर उपस्थित होत्या. या वेळी "सकाळ साप्ताहिका'च्या दिवाळी अंकाचेही प्रकाशन डॉ. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. 

डॉ. कोल्हे म्हणाल्या, ""घराघरांत गरिबी, कुपोषण असे असंख्य प्रश्‍न आहेत. पण तिथे स्त्री-भ्रूणहत्या होत नाही. मुलींच्या जन्माचा उत्सव केला जातो. मला अनाथाश्रम सुरू करायचा होता, पण तिथे एकही मुलं अनाथ नाही. वृद्धाश्रमाची गरज तिथे भासत नाही. कुमारी मातांनाही समाज मोठ्या मनाने स्वीकारतो. शहरी जीवनशैलीपेक्षा ही त्यांची जीवनशैली खूप वेगळी असून त्यातूनच जगण्याचा अर्थ उलगडतो.'' कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. 

लग्नासाठीच्या चार अटी 
""बैरागडसारख्या कुठल्याही सोय नसलेल्या गावात केवळ 400 रुपयांत घर चालवायचे, 40 किलोमीटर पायी चालायचे, नोंदणी पद्धतीने अवघ्या पाच रुपयांत लग्न करायचे आणि दुसऱ्यासाठी भीक मागायची तयारी ठेवायची, लग्नासाठी अशा चार अटी घालणाऱ्या मुलाला पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि मी डॉ. रवींद्र कोल्हे यांना भेटले. त्यांच्याकडे पाहून मी स्वत:चे आत्मपरीक्षण केले आणि लग्न करण्याचा निर्णय पक्का केला आणि विवाहबद्ध होऊन मेळघाटच्या वाटेवरचा प्रवास सुरू केला,'' अशी अनोखी लग्नाची गोष्ट डॉ. कोल्हे यांनी सांगितली. 

...मगच डॉक्‍टर म्हणून स्वीकारलं 
""एखादी महिला डॉक्‍टर असू शकते, अशी कल्पनाच नसल्यामुळे मेळघाटमधील आदिवासी मला "नर्सबाई' म्हणत. परंतु पावसाचे दिवस होते....पेरण्या झाल्या होत्या...म्हणून आदिवासी शिकारीसाठी जंगलात गेले. दाट झाडीतून पट्टेदार वाघाने "हरिराम'वर झडप मारली. वाघाच्या झडपेतून सुटका होण्यासाठी तो जिवाच्या आकांताने प्रयत्न करत होता. जखमी झालेल्या हरिरामला लोकांनी माझ्याकडे आणले. त्या वेळी डॉ. रवींद्र कोल्हे नसल्यामुळे "नर्सबाई तुम्ही टाके घालू शकाल का' असे विचारले. बघता बघता दीर्घकाळ चाललेल्या शस्त्रक्रियेत मी 400 ते 450 टाके घातले आणि हरिरामची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली. हरिरामचा जीव वाचविला आणि तेव्हापासून त्यांनी माझा "डॉक्‍टर' म्हणून स्वीकार केला,'' असा अनुभव सांगत डॉ. स्मिता कोल्हे यांनी जीवनप्रवास उलगडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com