कृषी प्रदर्शन ठरताहेत ग्राहक-शेतकऱ्यांमधील दुवा

कृषी प्रदर्शन ठरताहेत ग्राहक-शेतकऱ्यांमधील दुवा

पुणे - ‘‘कृषी प्रदर्शनांमधून शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोचविण्यास मदत होते. हे प्रदर्शन ग्राहक आणि शेतकऱ्यांमधील दुवा ठरत असून, ग्राहकांनीही याला चांगला प्रतिसाद दिल्यास शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस नक्कीच येतील,’’ असे मत राज्य कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ. सुभाष काटकर यांनी व्यक्त केले.

‘संवाद’ पुणे आणि पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे आयोजित ‘संवाद कलाकारांचा, संवेदना शेतकऱ्यांची’ संमेलनात ते बोलत होते. या प्रसंगी भरविण्यात आलेल्या फळा-फुलांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटनही डॉ. काटकर यांच्या हस्ते झाले. कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष अध्यक्ष विजय कोलते, कृषी उपसंचालक दिनकर कानडे, कृषी अधिकारी प्रवीण कदम, सूर्यकांत वडखेलकर, विठ्ठल सोनवणे, समीर हंपी, सुनील महाजन आणि निकिता मोघे उपस्थित होते.

या प्रदर्शनात फळे-फुले-भाज्यांच्या विविध जाती, बांबूपासून बनविलेले साहित्य, तांदूळ आणि डाळींचे विविध प्रकार मांडण्यात आले आहेत. हे प्रदर्शन मंगळवार (ता.१२) पर्यंत बालगंधर्व परिसरात सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत पाहता येईल.

कोलते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या उत्पादनांना हक्‍काचे व्यासपीठ मिळवून देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या संवेदना समजून घेऊन त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून द्यायला हवी.’’

‘आठवणीतील  आजीची भातुकली’
‘संवाद कलाकारांचा, संवेदना शेतकऱ्यांची’ या संमेलनांतर्गत बालगंधर्व कलादालनात विलास करंदीकर यांच्या ‘आठवणीतील आजीची भातुकली’ हे प्रदर्शन भरविले आहे. त्याचे उद्‌घाटन अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते झाले. यात सुमारे तीन हजारांहून अधिक भांडी आणि इतर साहित्य पाहायला मिळेल. या प्रदर्शनात मुकीम तांबोळी यांनी अर्कचित्र काढून रसिकांची दाद मिळवली. ‘भातुकलीच्या भांड्यांचे प्रदर्शनही अनुभवण्यासारखे आहे. कलेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वेदनेशी जोडले जाण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असे दामले यांनी सांगितले. छोट्या तांब्यापासून बादलीपर्यंत... पोळपाटापासून ते छोट्या वाटीपर्यंत...भातुकलीच्या खेळातील प्रत्येक भांडे येथे पाहता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com