कृषी योजनांचा निधी खर्च करण्यात अपयश - पांडुरंग फुंडकर

Pandurang-Phundkar
Pandurang-Phundkar

पुणे - कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी खर्च करण्यात अपयश आल्याच्या मुद्द्यावरून राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी खरमरीत पत्र लिहून कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. आर्थिक वर्ष संपत आले तरी निधी खर्च न होणे ही खेदाची बाब असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. या बाबीला जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून खर्चाबाबतचा अहवाल १९ मार्च रोजी समक्ष हजर राहून सादर करावा, असा आदेश फुंडकरांनी दिला आहे. 

‘शेतकरी माझ्याकडे योजनांचे अनुदान न मिळाल्याबाबत तक्रारी करीत असतात. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता निधी खर्ची पडत असल्याचे ते सांगतात. मात्र, प्रत्यक्षात बराचसा निधी अखर्चित राहिला असावा, असे बहुसंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून दिसून येते. ठिबक सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सबलीकरण योजना या व इतर योजनांच्या बाबत हीच परिस्थिती आहे,’ असे फुंडकरांनी आयुक्तांना लिहिलेल्या गोपनीय पत्रात म्हटले आहे.

केंद्र व राज्य सरकार कृषी विभागाच्या विविध योजनांना निधी उपलब्ध करून देते. त्यातून शेतकरी त्याचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करत असतात; त्याचे प्रतिबिंब देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उमटते, याची आठवण फुंडकरांनी करून दिली आहे. ‘आपण योजना राबविणारे प्रमुख अधिकारी असल्याने आपण खर्चाचा वेळोवेळी आढावा घेतला असेलच, असे असूनही आर्थिक वर्ष संपत आले तरी निधी खर्च न होणे ही खेदाची बाब आहे, ’ अशा भाषेत फुंडकरांनी पत्रात आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com