विमानतळाच्या जागेचे पुन्हा सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

तांत्रिक अडचणी आल्याने निर्णय; पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत दिल्लीत बैठक

तांत्रिक अडचणी आल्याने निर्णय; पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत दिल्लीत बैठक
पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेचे पुन्हा एकदा तांत्रिक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल येत्या चार आठवड्यांत सादर करण्याचा निर्णय दिल्ली येथे बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर विमानतळाशी संबंधित सर्व घटकांची संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्याला मान्यता देण्याचे ठरविण्यात आले.

नियोजित विमानतळासाठी राज्य सरकारने पुरंदर येथील जागा निश्‍चित केली आहे. त्याला राज्य सरकार, एअरपोर्ट ऍथॉरिटी आणि राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. मात्र, संरक्षण मंत्रालयाची मान्यता मिळालेली नाही. या संदर्भात दिल्ली येथे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह विमानतळ प्राधिकरण, एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया, संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.
राव म्हणाले, ""पुरंदर येथील जागेसंदर्भात एअर स्पेस आणि अन्य काही तांत्रिक अडचणी संरक्षण मंत्रालयाने उपस्थित केल्या आहेत. त्या संदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याच्या सूचना संरक्षण राज्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, त्यासाठी एअरपोर्ट ऍथॉरिटीने तयारी दर्शविली आहे.''

तांत्रिक सर्वेक्षण येत्या चार आठवड्यांत पूर्ण करण्यात येणार असून, त्याचा अहवाल संरक्षण मंत्रालयास सादर होईल. या महिन्याच्या अखेरीस अथवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन विमानतळास अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. या बैठकीला विमानतळाशी संबंधित सर्वच घटकांना बोलाविण्याचे ठरले आहे.
- सौरभ राव, जिल्हाधिकारी