सध्याचे सरकार शेतकरीविरोधी: अजित पवार

Ajit Pawar
Ajit Pawar

बारामती : सध्याचे सरकार शेतकरीविरोधी सरकार आहे, त्यामुळे भविष्यात दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँकेसह अन्य शेतकरी निगडीत संस्थांपुढे संकटे निर्माण केली जातील, मात्र या संकटांना न डगमगता व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जात स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौदाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अजित पवार बोलत होते. बाजार समितीचे सभापती रमेश गोफणे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल खैरे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 
आपल्या भाषणात अजित पवार यांनी सरकारवर तोफ डागली.

ते म्हणाले, केंद्रात आणि राज्यातही सरकारने घेतलेले निर्णय फसले आणि अर्थव्यवस्था कधी नव्हे ते उतरणीला लागली असे आपण माजी अर्थमंत्री म्हणून नमूद करतो. शेतकरी कर्जमाफीच्या घोषणा झाल्या पण किती शेतक-यांना किती रुपयांची कर्जमाफी मिळाली हे अजूनही कोणालाही माहिती नाही. दहा हजारांचे तातडीचे अर्थसहाय्य खऱीपाच्या पेरणीसाठी जाहिर केले गेले, एकाही शेतक-याला ते मिळाले नाही. 

नोटबंदीच्या निर्णयाने तर अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आणि आता हा निर्णय फसल्याचे सिध्द झाले. जीएसटी बाबतही सरकारचे नेमके धोरण अद्याप लोकांना समजतच नसल्याचे चित्र आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती दररोज बदलू लागल्याने व्यवसाय कसा करायचा हेच समजेनासे झाल्याचे पवार उद्वेगाने म्हणाले. 
सरकारवर शेतकरीविरोधी असा घणाघाती हल्ला करत भविष्यात सहकारी व शेतकरीनिगडीत संस्थांपुढील अडचणी आणखी वाढतील, पण त्यांना न डगमगता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंबर कसण्याचे आवाहन पवार यांनी या वेळी केले. बाजार समित्यांबाबत सरकारच्या धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com