मगर यांनी केली घरदार सांभाळून समाजसेवा - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

पुणे - 'देशासाठी आपण घर सोडले, परिवार सोडला असे सांगून काही जण सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र कर्मयोगी अण्णासाहेब मगर यांनी घरदार सांभाळूनही समाजसेवा करता येते, हे दाखवून दिले,'' अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली. "अण्णासाहेब मगर यांच्यावरील हे पुस्तक युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल,' असेही ते म्हणाले.

अमेय प्रकाशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. सीमा काळभोरलिखित "कर्मयोगी अण्णासाहेब मगर' या शोधग्रंथाचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार उल्हास पवार, जगन्नाथ शेवाळे, सुरेश घुले, उल्हास लाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अण्णासाहेबांच्या जीवनावरील हा शोधग्रंथ म्हणजे महाराष्ट्राच्या शंभर वर्षांच्या जडणघडणीचा ऐतिहासिक दस्तावेज आहे, असे सांगून पवार म्हणाले, 'घरची गर्भश्रीमंती असतानाही त्यांनी समाजासाठी आयुष्यभर रचनात्मक काम केले. त्यांचे जीवन म्हणजे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागाच्या विकासाची यशोगाथा आहे. त्यांनी परिश्रमातून महाविद्यालय, मार्केटयार्ड, थेऊर सहकारी साखर कारखाना यासारख्या संस्थांची निर्मिती केली. आजकाल मोठ्यांची नावे देऊन वेगळ्या पद्धतीने काम केले जाते. त्यातून संस्था आणि नाव बदनाम होते. मोठ्यांचे नाव दिले, तर त्यांच्यासारखाच कारभार करण्याची खबरदारी घेण्याची गरज आहे.''

देशासाठी, समाजासाठी त्याग केला हे सांगणाऱ्यांनी नेमका कशाचा त्याग केला, हे मात्र कळत नाही. त्यांचा दावा किती फोल आहे, हे अण्णासाहेब मगर यांच्यावरील शोधग्रंथ वाचल्यानंतर लक्षात येईल, असेही पवार म्हणाले. या वेळी उल्हास पवार आणि शेवाळे यांचे भाषण झाले. तर सीमा काळभोर यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली.

हेच का अच्छे दिन?
उल्हास पवार यांच्या भाषणादरम्यान मध्येच वीज गेली. तेव्हा "हेच का अच्छे दिन' अशी टिपण्णी अजित पवार यांनी केली. त्या वेळी सभागृहात हशा उसळला. त्यानंतर काही मिनिटांनी वीज पुन्हा आली आणि कार्यक्रम पूर्ववत सुरू झाला.

Web Title: pune news ajit pawar talking