कागदावरच "सावध राहा' !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

एसटी महामंडळाकडून केवळ घोषणाच
पुणे - राज्य महामार्ग परिवहन मंडळाने एसटी स्टॅण्ड व आगारातील सुरक्षिततेसाठी "सावध राहा' या मोहिमेची घोषणा केली खरी; परंतु दीड महिना उलटून गेल्यानंतरही त्यावरील उपाय योजना महामंडळाकडून करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही मोहीम सध्या तरी कागदावरच आहे.

एसटी महामंडळाकडून केवळ घोषणाच
पुणे - राज्य महामार्ग परिवहन मंडळाने एसटी स्टॅण्ड व आगारातील सुरक्षिततेसाठी "सावध राहा' या मोहिमेची घोषणा केली खरी; परंतु दीड महिना उलटून गेल्यानंतरही त्यावरील उपाय योजना महामंडळाकडून करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही मोहीम सध्या तरी कागदावरच आहे.

बस स्टॅंडवरील गर्दीचा गैरफायदा घेऊन पाकीटमारी व किरकोळ चोरीच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, महिलांची छेडछाड, त्यांच्याशी असभ्य वर्तन करणे, अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनाही घडतात. याला आळा घालण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सव्वा महिन्यापूर्वी एसटी स्टॅंड व आगारामधील सुरक्षिततेसाठी "सावध राहा' मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेअंतर्गत स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार होते, जेणेकरून एसटी स्थानके आणि त्यावरील सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल, हा हेतू त्यामागे होता.

त्यानुसार एसटी महामंडळाकडून प्रत्येक बस स्टॅंडवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले. आगारातील कार्यशाळा व परिसरात महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे ठरले. यापैकी एक कॅमेरा थेट आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात बसविण्यात येणार असल्यामुळे तेथील कामकाजाची माहिती वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोचविण्याचे नियोजन करण्यात आले. एसटी महामंडळाच्या गेल्या महिन्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या मोहिमेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली होती. परंतु, निर्णय होऊन सव्वा महिना उलटला आहे. मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.

सीसीटीव्हीचे चित्र अस्पष्ट
स्वारगेट एसटी स्टॅंड येथे पूर्वीपासूनच सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. परंतु, त्यांचा फारसा उपयोग होत नसल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांत स्वारगेट एसटी स्टॅंड येथे प्रवाशांच्या सामानाची चोरी आणि रोख रक्कम चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच, बोगस कंडक्‍टरने खोटी व जुनी तिकिटे देऊन प्रवाशांकडून पैसे वसूल करून पळ काढल्याच्याही घटना घडल्या आहेत. या घटना सीसीटीव्हीमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला असता, चित्र स्पष्ट दिसत नसल्याचे समोर आले होते.