सर्वच ठेवीदारांचे पैसे परत करणार - डीएसके

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पुणे - 'सर्व ठेवीदार माझे जीव की प्राण आहेत. त्यांनी मला 35 वर्षे सांभाळले आहे आणि मीदेखील त्यांना सांभाळले आहे. सर्व ठेवीदारांचे पैसे मला परत करायचे आहेत. त्यादृष्टीने माझे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. हा तिढा लवकरच सुटेल,'' असा विश्‍वास प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.

पुणे - 'सर्व ठेवीदार माझे जीव की प्राण आहेत. त्यांनी मला 35 वर्षे सांभाळले आहे आणि मीदेखील त्यांना सांभाळले आहे. सर्व ठेवीदारांचे पैसे मला परत करायचे आहेत. त्यादृष्टीने माझे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. हा तिढा लवकरच सुटेल,'' असा विश्‍वास प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.

ठेवींचे पैसे परत न केल्याने काही ठेवीदारांनी डी. एस. कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर श्री. कुलकर्णी बोलत होते. ते म्हणाले, 'न्यायालयीन आणि पोलिस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्‍वास आहे. सर्व ठेवीदार माझ्या अतिशय जवळचे आहेत. सुमारे 98 टक्के ठेवीदार माझ्याबरोबर आहेत. जेमतेम 2 टक्के ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. अर्थात, त्यांचेही बरोबर आहे; कारण त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. यामध्ये बहुतांश मध्यमवर्गीय आहेत, याची मला कल्पना आहे. तब्बल 35 वर्षे त्यांनी मला आणि मी त्यांना विश्‍वासाने सांभाळले आहे. ज्यांनी तक्रारी केल्या आणि ज्यांनी केल्या नाहीत, अशा सर्वांचे पैसे मी परत करणार आहे. थोडक्‍यात सर्वांचेच पैसे द्यायचे आहेत. गेल्या डिसेंबर-जानेवारीपासून हा प्रश्‍न सुरू आहे, ठेवीदारांचे पैसे परत देता यावेत यासाठी मी तेव्हापासून सातत्याने प्रयत्नशील आहे. दिवाळीच्या महिन्यात पाच कोटी रुपये परत केले आहेत. जसे पैसे येतील, तसे ते परत केले जात आहेत.''

'थकीत पैसे टप्प्याटप्प्याने 12 महिन्यांच्या हप्त्यांत परत करण्याबाबतच प्रस्ताव आम्ही लोकांसमोर ठेवला आहे. त्यावर विश्‍वास ठेवून अल्पावधीत 1527 जणांनी होकार अर्ज भरून दिले आहेत. तक्रारी करणाऱ्यांच्या पाचपट लोकांनी हे अर्ज भरून आमच्यावर विश्‍वास ठेवला आहे. मी माझ्या कामात व्यग्र असल्याने लोकांना प्रत्यक्ष भेटू शकत नाही. यामुळे ठेवीदारांमध्ये अकारण घबराटीचे वातावरण पसरत आहे; पण लोकांनी संयम बाळगून विश्‍वास ठेवावा. सर्वांचा पै न्‌ पै मी परत करणार आहे,'' असेही त्यांनी नमूद केले.