नोटाबंदीच्या दिवशी देशभर कार्यक्रम - जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पुणे - आठ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानिमित्त हा दिवस "काळ्या पैशाविरुद्ध लढ्याचा दिन' म्हणून देशभर साजरा करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. या दिवशी काळ्या पैशाविरोधात शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

देशातील काळ्या पैशाच्या विरोधातील मोहिमेचा एक भाग म्हणून गेल्या वर्षी आठ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयास पुढील महिन्यात एक वर्ष होत आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात त्याच दिवशी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलनाचे आयोजन केले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपच्या वतीने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या दिवशी काळ्या पैशाच्या विरोधात मोर्चा, व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद, जनजागरण मोहीम, भीम ऍप डाउनलोड करणे, डिजिटल साक्षरता आदी कार्यक्रम करण्यात येणार आहेत.

जावडेकर म्हणाले, 'केंद्रात मोदी सरकार आले त्या दिवसापासून काळ्या पैशाविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्याचा एक भाग म्हणून नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे तीन लाख कोटी रुपयांचे 4.7 लाख संशयास्पद व्यवहार समोर आले. दोन लाख खोट्या कंपन्या समोर आल्या. त्या सर्वांची तपासणी सुरू आहे; तर डिजिटल व्यवहारांना मोठी चालना मिळाली, करदात्यांची संख्या दीडपटीने वाढली. सोळा हजार कोटी रुपये चलनातून बाद झाले. विविध देशांशी करार केल्यामुळे काळा पैसा फिरविण्याची शक्‍यता संपुष्टात आली.''

हे काळ्या पैशाचे समर्थन
कॉंग्रेसच्या सत्तर वर्षांच्या काळात देशात काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था सुरू होती. ती या निर्णयामुळे मोडीत निघाली. असे असतानाही कॉंग्रेस आठ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणार आहे, हे एकप्रकारे काळ्या पैशाचे समर्थन आहे. कॉंग्रेसला इतक्‍या वर्षांत जे जमले नाही, ते आम्ही तीन वर्षांत करून दाखविले, असेही जावडेकर म्हणाले.