हल्ले होऊ नयेत, अशी व्यवस्था हवी - सलीम शेख

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

पुणे - ""अमरनाथ यात्रेतील 50 पेक्षा अधिक यात्रेकरूंचे प्राण वाचविल्याबद्दल माझा मान-सन्मान होत आहे, याचा आनंद आहे; पण त्याच वेळी माझ्या मनात दु:खही आहे की, "त्या' हल्ल्यात आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. असे भ्याड हल्ले पुन्हा होऊ नयेत अशी व्यवस्था तयार झाली पाहिजे'', अशी भावना व्यक्त करत वाहनचालक सलीम शेख यांनी "पुन्हा अमरनाथ यात्रेला जाणार आहे', असे सांगत आपल्यातील धाडसाचे दर्शन घडवले. 

पुणे - ""अमरनाथ यात्रेतील 50 पेक्षा अधिक यात्रेकरूंचे प्राण वाचविल्याबद्दल माझा मान-सन्मान होत आहे, याचा आनंद आहे; पण त्याच वेळी माझ्या मनात दु:खही आहे की, "त्या' हल्ल्यात आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. असे भ्याड हल्ले पुन्हा होऊ नयेत अशी व्यवस्था तयार झाली पाहिजे'', अशी भावना व्यक्त करत वाहनचालक सलीम शेख यांनी "पुन्हा अमरनाथ यात्रेला जाणार आहे', असे सांगत आपल्यातील धाडसाचे दर्शन घडवले. 

"सरहद'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात शेख यांचा डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर शेख यांनी अमरनाथमध्ये घडलेल्या "त्या' थरारक प्रसंगाला उजाळा दिला. उद्योजक कृष्णकुमार गोयल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, "सरहद'चे संस्थापक संजय नहार, युवराज शहा, शैलेश वाडेकर उपस्थित होते. 

शेख म्हणाले, ""आम्ही भगवंताचे दर्शन घेऊन परत निघालो होतो. गाडीत "जय भोले'चा नारा सुरू होता. तेवढ्यात दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. सुरवातीला हा फटाक्‍यांचा आवाज वाटला; पण जेव्हा गाडीच्या काचा फुटू लागल्या तेव्हा कळले की हा हल्लाच आहे. "जय भोले'चा नारा कधी किंचाळ्यामध्ये रूपांतरित झाला कळलेच नाही. हल्ला झाला म्हणून मी गाडी थांबवली नाही. उलट वेग वाढवला आणि सुरक्षित ठिकाण गाठले. तिथले सैनिक लगेच धावून आले. जखमी लोकांवर उपचार सुरू झाले. त्यामुळे काहींचे प्राण वाचले; पण आठ जणांचा मृत्यू झाला, याचे दु:ख आहे.'' अशा जीवघेण्या हल्ल्यावेळी कसे वागायचे याचे बळ मिळाले, ते तिथल्या पवित्र वातावरणामुळेच, असेही शेख म्हणाले. 

आढाव म्हणाले, ""वेळ आल्यावर कष्टकरी माणूस पेटून उठतो, हे शेख यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. ते सैन्यदलात नसले तरी त्यांचे कार्य सैनिकासारखेच आहे. सरकारने त्यांच्या कार्याची दखल घ्यायला हवी.'' नहार म्हणाले, ""शेख यांनी यात्रेकरूंचे केवळ प्राण वाचवले नाहीत, तर एकतेचा धागाही नव्याने जोडला आहे. हे काम पाहून नवनवीन "सलीम' तयार व्हावेत.'' 

मदतीचे हात आले पुढे 
मूळचे जळगावचे असलेले सलीम शेख नोकरीनिमित्ताने गुजरातमध्ये स्थायिक आहेत; पण त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, हे समारंभात जाहीर होताच मदतीचे अनेक हात पुढे आले. डॉ.आढाव यांनी राष्ट्रीय एकात्मता समितीतर्फे 25 हजार रुपये, गोयल यांनी एक लाख रुपये, "सरहद'तर्फे 25 हजार, "दगडूशेठ ट्रस्ट'तर्फे 35 हजार रुपयांची मदत जाहीर झाली. इतकेच नव्हे; उपस्थित रसिकांनीही आपापल्या परीने मदत दिली. असे एकूण दोन लाख रुपये शेख यांना मदत म्हणून देण्यात आली.