वीस वर्षांनंतरही सुविधांचा अभाव 

वीस वर्षांनंतरही सुविधांचा अभाव 

पुणे - अपुरे व अरुंद रस्ते, पिण्याच्या पाण्याची वानवा, जागोजागी कचऱ्याचे ढीग, अस्तित्वातच नसलेली आरोग्य यंत्रणा, वाढत्या नागरीकरणामुळे गुदमरलेले रहिवासी...हे चित्र आहे 20 वर्षांपूर्वी म्हणजे 1997 मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील! एवढ्या वर्षांत येथील रहिवाशांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, वाहतूक या सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचे "सकाळ'च्या पाहणीत आढळून आले आहे. महापालिका अजूनही पिण्याचे पाणी पुरवत नसल्याची ओरड बहुतांशी गावांत कानावर येत. 

हद्दीलगतच्या गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी 1997 मध्ये 23 गावांचा महापालिकेत समावेश झाला. त्यानंतर गावांमधील रहिवाशांना पायाभूत सुविधा पुरविण्याची घोषणा तेव्हाच्या सरकारने केली. प्रत्यक्षात मात्र या गावांमध्ये नवे रस्ते बांधणी सोडा; पण जुन्या रस्त्यांची स्थितीही सुधारलेली नसल्याचे दिसून आले. अतिक्रमणांवर हातोडा उगारून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याचे धाडस महापालिका प्रशासनाने दाखविले नाही. गावांमधील लोकसंख्या वाढली; पण त्यांना चांगली आरोग्य सेवा पुरविणारी यंत्रणा उभारण्यात महापालिकेला अपयश आल्याचे ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर जाणवले. काही गावांमध्ये रस्ते असले, तरी तेथील पीएमपी सेवा तोकडी असल्याचे दिसून आले. त्यामुळे तेथील रहिवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. 

वडगावशेरीतही अनेक समस्या 
वडगावशेरी, कल्याणीनगर या झपाट्याने विस्तारलेल्या परिसराचा समावेश असलेल्या वडगावशेरीत अजूनही पिण्याचे पाणी, कचरा आणि रस्ते या समस्या गंभीर असल्याचे फेरफटका मारल्यानंतर दिसून आले. गावातील कचरा गोळा केला जातो; पण तो रस्त्यालगत टाकण्यात येतो. गावाशेजारी नदीपात्रालगत कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. त्यामुळे डुकरे आणि मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील जुन्या मंडईत सेवासुविधा नसल्याने भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्यांचे हाल होतात. काही रस्त्यांवरील दिवे गायब होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. नगर रस्त्यावरून गावात जाणारा मुख्य रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यातच रस्त्यालगत असणाऱ्या शाळा व दुकानांमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात. त्यामुळे कोंडीत भर पडते. 

धानोरीत पायाभूत सुविधाच नाहीत 
धानोरी-लोहगावमध्ये गेल्या 10 वर्षांत मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे साहजिकच नागरीकरणही वाढले. परिणामी पायाभूत सेवासुविधांवर ताण आला. तो कमी करण्यात यंत्रणांनाही पूर्णपणे अपयश आले आहे. धानोरीतील प्रमुख रस्त्यांचा दर्जा चांगला आहे; पण जोड आणि अंतर्गत रस्त्यांची स्थिती खराब आहे. त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रयत्न होत नसल्याचे गावातील महिलांनी म्हणणे आहे. याशिवाय कचऱ्याचा प्रश्‍न तितकाच गंभीर असून, तो अजूनही दुर्लक्षित आहे. गावठाणात पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे महिलांनी सांगितले. लोहगावमधील रस्त्यांवरून वाहने नागमोडी पद्धतीने पुढे जातात. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. त्यातच जागोजागी प्रचंड खड्डे दिसून येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com