पाणी मीटर पुरविण्यासाठी अमेरिकन कंपनी ‘उत्सुक’

पाणी मीटर पुरविण्यासाठी अमेरिकन कंपनी ‘उत्सुक’

पुणे - नियोजित समान पाणीपुरवठा योजनेसाठी खरेदी करण्यात येणारे पाणी मीटर कालबाह्य असल्याचे सांगत, योजनेकरिता अत्याधुनिक मीटर पुरविण्यासाठी अमेरिकेतील कंपनी पुढे आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यातील खर्च करण्याची तयारीही दाखविली असून, तसे पत्र ‘स्मार्ट सिटी’ कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाठविले आहे. मात्र, योजनेची अंमलबजावणी महापालिकेच्या स्तरावर होत असल्याने ते पत्र महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे दिल्‍याने मीटर खरेदीच्‍या प्रक्रियेत स्‍पर्धा होऊन गुणवत्तापूर्ण मीटर मिळण्याची आशा आहे. 

पुणेकरांना समान व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी २ हजार ३२५ कोटी रुपयांची योजना राबविण्यात येणार आहे. योजनेच्या सुधारित पूर्वगणकपत्राला मंजुरी मिळाल्यानंतर येत्या जूनपासून योजनेचे काम हाती घेतले जाण्याची शक्‍यता आहे. त्यात जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्‍या, मीटर ही कामे करण्यात येणार आहे. 

दरम्यान, योजनेंतर्गत निवासी आणि व्यावसायिक स्वरूपाचे सुमारे सव्वातीन लाख मीटर खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठी परदेशी कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. मीटर पुरविण्याच्या कामासाठी जागतिक पातळीवरील कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. त्यानुसार महापालिकेने नियोजित केलेले मीटर कालबाह्य असून, त्यात बिघाड होण्याची शक्‍यता असल्याचे अमेरिकास्थित कंपनीचे म्हणणे आहे. योजनेची परिणामकारकता वाढविण्यासाठी चांगल्या दर्जाचे मीटर पुरविले जातील. तसेच मीटर खरेदी केल्यानंतर त्यांच्या प्राथमिक कामांचा खर्च केला जाईल, असेही कंपनीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मीटर पुरविणाऱ्या विविध कंपन्या पुढे आल्या असून, त्यांचे दरपत्रकही महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्यानुसार मीटरचा दर्जा आणि किमतीची पडताळणी केली आहे. त्यातच, योजना राबविण्याआधी नळजोडांची पाहणी करण्यात येणार असून, काही भागात दोन नळजोडांना एक मीटर पुरविता येईल, याचीही चाचपणी करण्यात येईल. त्यामुळे खरेदी करण्यात येणाऱ्या मीटरचा आकडा कमी होऊन तो पावणेतीन लाख होण्याचा अंदाज आहे. मात्र, मीटर खरेदी टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

योजनेचे काम वेळेत आणि दर्जा राखून करण्यात येणार आहे. त्यामुळे मीटरसह सर्वच घटक चांगल्या दर्जाचे असतील. ज्या कंपन्या प्रक्रियेत येतील, त्यांच्याकडील मीटरची गुणवत्ता पाहून ते खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मीटरची गुणवत्ता आणि किंमत हा घटक महत्त्वाचा आहे. ही खरेदी प्रक्रियेनुसार होईल. 
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com