चित्रपटविषयक भान वाढण्याची गरज

नीला शर्मा
बुधवार, 24 जानेवारी 2018

चित्रपट महोत्सवांबद्दल सध्या जगभर उत्सुकता वाढलेली दिसून येते. भारतात, विशेषतः महाराष्ट्रात या संदर्भात काय दिसतं, याचा वेध घेण्यासाठी चित्रपट दिग्दर्शक व अभ्यासक अनिल झणकर यांच्याशी नीला शर्मा यांनी साधलेला हा संवाद. 

चित्रपट महोत्सवांबद्दल सध्या जगभर उत्सुकता वाढलेली दिसून येते. भारतात, विशेषतः महाराष्ट्रात या संदर्भात काय दिसतं, याचा वेध घेण्यासाठी चित्रपट दिग्दर्शक व अभ्यासक अनिल झणकर यांच्याशी नीला शर्मा यांनी साधलेला हा संवाद. 

 प्रश्न : भारतात चित्रपट महोत्सव केव्हापासून होऊ लागले?
- १९५० मध्ये आपल्याकडे पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सरकारतर्फे भरविण्यात आला होता. मग सुमारे पंचवीस वर्षांनंतर पुन्हा सरकारनेच आधीसारखा महोत्सव दिल्लीत भरवला. त्यानंतर गोव्यात वीस वर्षांपासून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (इफ्फी) होऊ लागला. या पाठोपाठ कोलकाता, बंगळूर, मुंबई, पुणे व हैदराबाद या शहरांमध्येही चित्रपट महोत्सवाचे आयोजन होऊ लागले. चेन्नई, तिरुअनंतपुरम, जयपूर व कोल्हापूरसारख्या शहरांची त्यात भर पडत गेली. आता छोट्या गावांमध्ये देखील महोत्सवासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या भारतातील बहुतांश ठिकाणच्या महोत्सवाचे प्रारूप हे इफ्फीप्रमाणेच पाहायला मिळते. केरळमधला महोत्सव मात्र वेगळ्या  धाटणीचा असतो.

 प्रश्न : जगातले महत्त्वाचे चित्रपट महोत्सव कोणते?
- साधारणपणे दहा ते बारा ठिकाणच्या चित्रपट महोत्सवांकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले असते. टोरांटो, ब्राझील, कान व व्हेनिसच्या महोत्सवांना मोठी परंपरा आहे. तेहरान व मॉस्कोच्या महोत्सवांना वलय होते, पण ते आता बंद झाले आहेत. पूर्वेकडे बुसानला भरणारा महोत्सवही चांगला असतो. झेकोस्लोवाकिया व कार्लोव्ही वेरी या शहरांमधील महोत्सवही खास असतात.

 प्रश्न : आपल्याकडे या महोत्सवातून काय साध्य होतं? काय व्हायला हवं?
- महोत्सवांमुळे प्रेक्षकांना नाना प्रकारच्या विषय, आशयाचे व वेगळेपण असणारे चित्रपट बघायची संधी उपलब्ध होते. यात सहभागींना काही चित्रपट स्पर्धेशिवायचे, काही मागच्या काळातले, तर काही समकालीन आणि एखाद्या व्यक्तीशी संबंधित चित्रपट सलग पाहायला मिळतात. भारतात अनेकदा एका ठिकाणच्या महोत्सवात दाखवलेले चित्रपटच इतर ठिकाणी दाखवले जातात. याऐवजी प्रत्येक ठिकाणच्या महोत्सवात वेगळे चित्रपट दाखविल्यास बाहेरून येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढू शकेल.

 प्रश्न : या महोत्सवांमुळे सर्वसामान्य प्रेक्षकांची चित्रपट रसग्रहणाची जाण वाढते का?
- महोत्सवात यासाठी फारसं काही करणं अवघड दिसतं. मात्र चित्रपट हे आपल्या एकूणच समाज व संस्कृतीचा भाग होण्यासाठी शैक्षणिक पातळीवर प्रयत्न होणं गरजेचं आहे. केरळ व बंगाल या दोनच राज्यांमध्ये याबाबत गांभीर्यानं पावलं उचलण्यात आली आहेत. तेथे महत्त्वाचे जागतिक, भारतीय चित्रपट व त्या संदर्भात भरीव योगदान करणाऱ्यांबाबत अभ्यासक्रमात धडे योजलेले असतात. चित्रपट आपल्या सांस्कृतिक जीवन व्यवहाराचा मोठा भाग व्यापून असल्यामुळे त्याबाबत लोकशिक्षण व्हावं, याचाच एक भाग म्हणून शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणात या विषयाला जाणीवपूर्वक स्थान मिळायला हवं.

Web Title: pune news Anil Jhankar interview