'जायका प्रकल्पाचे काम नोव्हेंबरमध्ये सुरू होणार'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पुणे - मुळा-मुठा नदी सुधारणेसाठीच्या "जायका' प्रकल्पाच्या निविदा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिल्लीतील बैठकीनंतर गुरुवारी दिली. तसेच या प्रकल्पांतर्गत बाणेरमध्ये सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम 16 ऑक्‍टोबरपूर्वी सुरू होणार आहे. 

"जायका' प्रकल्पातील पुण्यातील कामाच्या निविदा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून रखडली आहे. त्याबाबत मार्ग काढण्यासाठी शिरोळे यांनी दिल्लीत बैठक आयोजित केली होती. डॉ. हर्षवर्धन, राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाचे (एनआरसीडी) संजय सिंग, सल्लागार ब्रिजेश सिक्का, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पाणीपुरवठा विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी आदी याप्रसंगी उपस्थित होते. राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (एनआरसीडी) आणि जायका (जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी) या दोन्ही संस्थांमार्फत प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करण्याचा प्रलंबित विषय 30 नोव्हेंबरपूर्वी मार्गी लावण्यात येईल, असे बैठकीत ठरल्याची माहिती शिरोळे यांनी दिली. 

सांडपाणी वाहिन्या टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाची सुरवात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस करण्यात येईल, असेही शिरोळे यांनी नमूद केले. तसेच, "जायका'बाबतच्या कामाचा प्रगती अहवाल शिरोळे यांना दर आठवड्याला सादर करण्याचा आदेशही डॉ. हर्षवर्धन यांनी संबंधितांना बैठकीत दिला.