औंध छावणीत थरार

औंध - भारत- श्रीलंका संयुक्त लष्करी सरावाच्या प्रात्यक्षिकांमधील रोमांचकारी दृश्‍य.
औंध - भारत- श्रीलंका संयुक्त लष्करी सरावाच्या प्रात्यक्षिकांमधील रोमांचकारी दृश्‍य.

पुणे - गावाच्या मध्यभागी असलेली इमारत... इमारतीत लपलेले दहशतवादी... या दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी घराला चारी बाजूने घेरत हळूहळू पुढे सरकणारे सैन्य आणि दोघांमधील चकमक... एखाद्या सिनेमाची अथवा काश्‍मीरसारख्या एखाद्या प्रदेशाची आठवण करून देणारे हे दृश्‍य. अशा परिस्थितीचा सैनिक नेमका कसा सामना करतात याचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक सैन्याकडून सादर करण्यात आले. 

वाढता दहशतवाद आणि घुसखोरी यांचा एकत्रित सामना करण्यासाठी सैन्यदलाकडून घेण्यात आलेल्या भारत व श्रीलंकेच्या ‘मित्रशक्ती’ या संयुक्त लष्करी सरावाचा औंध सैन्य छावणी येथे गुरुवारी समारोप झाला. तेरा दिवसांच्या या लष्करी सरावात दोन्ही देशांतील २४० जवान आणि अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. भारतीय सैन्यदलातील ब्रिगेडिअर आलोक चंद्रा, श्रीलंकेच्या सैन्यदलाचे ब्रिगेडिअर अजित पल्लवेला राणा विक्रम पद्दकम, राणा सुरा पद्दकम, मेजर मनीष बरल यांनी या सरावाची पाहणी केली. कर्नल देवेंद्र कुमार, लेफ्टनंट कर्नल सुमेधा रंगणा या वेळी उपस्थित होते.

आतापर्यंत ३० ते ३५ जवानांच्या तुकडीबरोबर हा सराव होत असे, यंदा प्रथमच २४० जवानांच्या तुकडीचा समावेश या सरावात करण्यात आला. सरावावेळी हेलिकॉप्टरमधून दोरखंडाच्या साहाय्याने उतरताना सैन्यदलांच्या जवानांची चपळाई दिसून आली. तीन बाय सहा आकाराच्या खड्ड्यात रात्रंदिवस बसून युद्ध कसे करतात याचेदेखील प्रात्यक्षिक या वेळी दाखविण्यात आले. 

यावेळी कर्नल देवेंद्र कुमार म्हणाले, ‘‘जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील लढा प्रबळ करण्यासाठी अशाप्रकारचा संयुक्त सराव महत्त्वपूर्ण ठरतो. हे या सरावशृंखलेचे पाचवे वर्ष आहे. लष्करी कारवाईमधील नियोजन, युद्धनीती आणि दोन सैन्यांमधील परस्पर सहकार्य वाढविण्याचे कार्य अशा सरावातून साध्य होते. या प्रशिक्षणाचा दोन्ही देशांच्या सैन्याला चांगला फायदा झाला असून दहशतवादाचे कसलेही संकट समर्थपणे पेलण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.’’ 

संयुक्त सरावाच्या समारोपप्रसंगी मल्लखांब, जिम्नॅस्टिक, सैन्याचे बॅंडवादन याबरोबरच श्रीलंकेतील पारंपरिक नृत्याचे सादरीकरण झाले. 

संयुक्त लष्करी सरावामुळे भारतीय आणि श्रीलंकेच्या सैन्याला अनेक नवीन कौशल्ये आत्मसात करता आली. दोन्ही देशांतील सैन्यामध्ये परस्परसहकार्य आणि मैत्रीची भावना निर्माण झाली. दहशतवादाविरोधातील लढाई आता अधिक ताकदीने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह लढणे गरजेचे आहे, यासाठी हा सराव नक्कीच महत्त्वपूर्ण ठरतो. 
- आलोक चंद्रा, ब्रिगेडिअर, भारत

लष्करी सरावातून युद्धकौशल्य आत्मसात करण्यासोबतच, भारतीय सैन्याशी जवळीक साधता आली याचा आनंद वाटतो. सरावादरम्यान सैन्याकडून आदराची वागणूक मिळाली. पुढील वर्षी श्रीलंकेत होणाऱ्या सरावामध्ये भारतीय दलाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असेन. येथून केवळ युद्धकौशल्यच नव्हे तर अनेक आठवणीही सोबत घेऊन जात आहे.
- अजित पद्दकम, ब्रिगेडिअर, श्रीलंका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com