दक्षिण मुख्यालयाचे १२४ व्या वर्षात पदार्पण

Army-South-Headquarter
Army-South-Headquarter

पुणे - भारतीय लष्कराचे सर्वांत मोठे दक्षिण मुख्यालय (सदर्न कमांड) एक एप्रिल रोजी १२४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या मुख्यालयाच्या अखत्यारित ११ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेश मिळून देशाचा सुमारे ४१ टक्के भूभाग येतो. तसेच ५३ लष्करी तळांवर मुख्यालयाच्या ४३ प्रशिक्षण संस्था आहेत. ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांतून मुख्यालयाच्या इतिहासाला उजाळा दिला जाणार आहे. 

भारतातील सर्वांत जुने लष्करी मुख्यालय असलेले दक्षिण मुख्यालय एक एप्रिल रोजी १२४ वा स्थापना दिवस साजरा करीत आहे. १८९५ मध्ये दक्षिण मुख्यालयाची स्थापना पुण्यात करण्यात आली. २१ एप्रिल १९४२ रोजी मुंबई प्रांत, दख्खन प्रांत, मद्रास प्रांत आणि पुणे स्वतंत्र ब्रिगेड क्षेत्राचा समावेश करून ‘बॉम्बे आर्मी’ असे नामकरण करून बंगळूर येथे मुख्यालय हलविण्यात आले. त्यानंतर १ जुलै १९४६ रोजी पुन्हा ‘दक्षिण मुख्यालय’ असे नामकरण करून पुन्हा पुण्यात आणण्यात आले. १ मे १९४८ रोजी देशातील पहिले जनरल ऑफिसर कमांडिंग चीफ, लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंहजी यांनी दक्षिण मुख्यालयाची सूत्रे हाती घेतली. दक्षिण मुख्यालयाच्या लष्कराने देशाच्या बहुतांश युद्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावून शौर्य गाजवले आहे. 

दक्षिण मुख्यालयाच्या जवानांची कामगिरी 
 १९४७-४८ मध्ये जुनागड आणि हैदराबाद ऑपरेशन
 १९६१ मध्ये गोवा, दीव आणि दमणला स्वातंत्र्य 
 १९७१ च्या भारत-पाक युद्धात लाँगेवाला येथील ‘इस्लामगड आणि भाई खानेवाला खू’ प्रदेश ताब्यात 
 १९८७ ते १९९० पर्यंत श्रीलंका ‘ऑपरेशन पवन’
 १९९९ मध्ये ‘ऑपरेशन विजय’ 
 २००१ मध्ये ‘ऑपरेशन पराक्रम’
 एकूण ७० शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कारांनी गौरव

लोकोपयोगी कामगिरी
दक्षिण मुख्यालयाच्या जवानांनी लोकोपयोगी कामगिरीदेखील बजावली आहे. २००१ कोयना, लातूर आणि भूज येथील भूकंप, २०१५ मधील चेन्नई येथील सुनामी, २०१७ मध्ये राजस्थान आणि गुजरातमधील महापुरात आपत्ती व्यवस्थापन केले. २९ सप्टेंबर २०१७ मध्ये एलिफिस्टन रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेनंतर ११७ दिवसांमध्ये एलिफिस्टन, करी रस्ता आणि आंबिवली येथे तीन रेल्वे पदपथ, उड्डाण पूल बांधून त्यांचे लोकार्पण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com