... म्हणून असा लेखक विरळाच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पुणे - 'पत्रकार म्हणून जगलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या वास्तवाच्या बळकट आधारामुळे साहित्यिक अरुण साधू यांच्या कादंबऱ्यांना वेगळेपणा लाभला. त्याबरोबरच त्यांच्या विलक्षण धावत्या, प्रवाही लेखनशैलीमुळे आणि अनोख्या सर्जनशीलतेमुळे त्या कलात्मक उंचीही गाठू शकल्या. असा लेखक खरोखर विरळाच असतो'', अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे यांनी साधू यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पत्रकारितेबरोबरच साहित्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलेले अरुण साधू यांचे सोमवारी निधन झाले. त्यांना साहित्यक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. काळे म्हणाले, 'विदर्भातील छोट्याशा गावातून पुढे आलेल्या या लेखकाने मुंबईसारख्या महानगरांतील स्फोटक, दाहक वास्तवाचे भान ज्या पद्धतीने आपल्या लेखनातून व्यक्त केले ते केवळ अजोड आहे. कोणतीही तडजोड न करता आपल्या निर्मिती प्रक्रियेशी इमानदार राहणारा हा लेखक होता. रोमॅंटिक, भाबड्या पद्धतीने लिहिल्या जाणाऱ्या राजकीय कादंबऱ्यांपेक्षा अत्यंत वेगळ्या राजकीय कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.''

समाजाचे सूक्ष्म निरीक्षण
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (माजी संमेलनाध्यक्ष) : अरुण साधू हे महत्त्वाचे कादंबरीकार होते. त्यांच्या समाजाच्या विविध स्तरांचे अतिशय समृद्धपणे आणि सूक्ष्मपणे निरीक्षण केले आहे. विशेषत: समाजातील दलित, शोषित घटकांविषयी त्यांनी कायम जवळीक वाटत होती. त्यातूनच त्यांच्या "बहिष्कृत'सारख्या कादंबरीचा जन्म झाला. याशिवाय, भारतातील राजकारणाचे ते सूक्ष्म जाणकार होते. त्यातूनच "सिंहासन', "मुंबई दिनांक' या कादंबऱ्या निर्माण झाल्या. त्यांचे "आणि ड्रगन जागा झाला' हे पुस्तक तर अनेकांना भावले आहे. असा लेखक पुन्हा होणार नाही, हे स्थान त्यांनी मिळवले होते.

प्रगल्भ लेखक
डॉ. श्रीपाल सबनीस (माजी संमेलनाध्यक्ष) : इंग्रजी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असलेले, या भाषांत पत्रकारिता केलेले आणि विपुल लेखन केलेले एक प्रगल्भ लेखक म्हणून अरुण साधू ओळखले जातात. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील त्यांचे स्थान महत्त्वाचेच आहे. त्यांच्या "बहिष्कृत'सारख्या वेगवेगळ्या साहित्यकृती मी विद्यार्थ्यांना शिकवल्या आहेत. पत्रकारितेतील त्यांचे लेखन कायमच नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे आहे.

आयुष्यातील मार्गदर्शकच हरपला
'वैचारिक बैठक आणि राजकीय तर्कनिष्ठता पक्की असलेल्या पत्रकारांमध्ये साधू यांचे नाव आपल्याला घ्यावेच लागेल. त्यांचा अभ्यास केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नव्हता. जगभरातील राजकारणाचा, वेगवेगळ्या क्रांत्या-चळवळींचा अभ्यास होता. त्यावर त्यांनी पुस्तकेही लिहिली. त्यांना केवळ वर्तमानाचे भान नव्हते. भविष्याचाही ते वेध घ्यायचे. अशा विचारातूनच "सिंहासन' लिहिली गेली. राजकारण मांडत असताना अंतरंगात खोल शिरून गोष्टी मांडणे, हे त्यांच्या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. जे "मुंबई दिनांक'मध्येही पाहायला मिळते. या दोन कलाकृती एकत्र करून "सिंहासन' चित्रपट आला; पण आपल्या दोन्ही कादंबऱ्या दुसऱ्या लेखकाला (विजय तेंडुलकर) पटकथेसाठी द्यायच्या आणि त्या पटकथेचे कौतुकही करायचे यालाही मनाचा मोठेपणा लागतो. पटकथाच नव्हे चित्रपटही त्यांना मनापासून आवडला. सर्वकालीन हे या चित्रपटाचे आणि कादंबरीचेही वैशिष्ट्य आहे. पुढे त्यांनी माझ्यासाठी "पडघम' नाटक लिहिले. "जपलेल्या पाऊलखुणा' या माहितीपटाचे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यावरील चित्रपटाचेही लेखन केले. त्यांच्या निधनाने माझ्या आयुष्यातील एक मार्गदर्शकच हरपला आहे.
- डॉ. जब्बार पटेल (दिग्दर्शक)

जेष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांच्या निधनाने आपल्या साहित्यातून समकालीन राजकीय-सामाजिक स्थितीचे यथार्थ दर्शन घडवून मराठी साहित्याला वास्तववादी वळण देणारा लेखक आपण गमावला आहे, आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि सामाजिक स्थित्यंतराचे अभ्यासू निरीक्षक असलेल्या साधू यांनी अनेक सामाजिक प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी केली. मराठी साहित्याला समृद्ध करतानाच त्यांनी पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील एक परखड, व्यासंगी साहित्यिकाला आपण मुकलो आहोत. 
- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री 

अरुण साधू हे मराठी पत्रकारिता व साहित्यातले दीपस्तंभ होते. या क्षेत्रात येणाऱ्या नवयुवकांसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्रोत होते. मराठी, इंग्रजी वर्तुळात सहजपणे वावरणारे, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे, निगर्वी स्वभावाचे अरुण साधू अजातशत्रू होते. 
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

लोकानुवर्ती विचार हाच मूलाधार 
डॉ. श्रीपाद जोशी (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ) - अरुण साधू हे माझे बरेच जुने स्नेही होते. महत्त्वाचे लेखक, पत्रकार होते. नागपूरला आम्ही 2007 मध्ये घेतलेल्या 80 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ते मूळचे विदर्भाचेच होते. भूमिका घेणारे व त्यावर ठाम राहणारे होते. आमच्या भूमिकांमध्येही बरेच साम्य होते. समताधिष्ठित समाजासाठीचा लोकानुवर्ती विचार हा त्यांच्या लेखनाचा व पत्रकारितेचाही मूलाधार होता. मराठीत वेगळ्या शैलीची, वेगळ्या विषयांची, आशयाची समृद्ध भर त्यांनी घातली. राजकीय कादंबरी त्यांनीच प्रतिष्ठित व समृद्ध केली. 
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली.

Web Title: pune news arun sadhu tribute