खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे ।।

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

पुणे - कुठे दाटलेले आभाळ... ऊन-पावसाचा खेळ, तर कुठे अचानक बरसणाऱ्या सरीवर सरी..! अशा वातावरणात पुणेकरांच्या कानी पडत होता टाळ- मृदंगाच्या निनादात सुरू असलेला विठ्ठल नामाचा गजर. तीर्थक्षेत्री पंढरपुरी विठुरायाच्या भेटीची इच्छा वडीलधाऱ्यांनी शहरातील विठ्ठल मंदिरातील विठ्ठल-रुक्‍मिणीचे दर्शन घेऊन पूर्ण केली. विठुरायाच्या चरणी लीन होण्यापासून ते विठ्ठल नामसंकीर्तनाचा हा महिमा पुणेकरांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला. विशेषतः मुळा-मुठेच्या तीरावरील विठ्ठलवाडी व औंध येथील विठ्ठल मंदिराबाहेर भाविकांचा मळा फुलल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले.

पुणे - कुठे दाटलेले आभाळ... ऊन-पावसाचा खेळ, तर कुठे अचानक बरसणाऱ्या सरीवर सरी..! अशा वातावरणात पुणेकरांच्या कानी पडत होता टाळ- मृदंगाच्या निनादात सुरू असलेला विठ्ठल नामाचा गजर. तीर्थक्षेत्री पंढरपुरी विठुरायाच्या भेटीची इच्छा वडीलधाऱ्यांनी शहरातील विठ्ठल मंदिरातील विठ्ठल-रुक्‍मिणीचे दर्शन घेऊन पूर्ण केली. विठुरायाच्या चरणी लीन होण्यापासून ते विठ्ठल नामसंकीर्तनाचा हा महिमा पुणेकरांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला. विशेषतः मुळा-मुठेच्या तीरावरील विठ्ठलवाडी व औंध येथील विठ्ठल मंदिराबाहेर भाविकांचा मळा फुलल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले.

‘पाऊले चालती पंढरीची वाट’, ‘विठ्ठल नामाची शाळा भरली’, ‘धरीला पंढरीचा चोर’, ‘चंद्रभागेतिरी पंढरी’, ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’, ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ अशी विठ्ठलभक्तीची गाणी ऐकतच पुणेकरांची मंगळवारची सकाळ झाली. विठ्ठलवाडीतील विठ्ठल-रखुमाई देवस्थान, औंधमधील विठ्ठल मंदिराबरोबरच शहराच्या मध्यवर्ती भागातील श्री लिंबराज महाराज देवस्थान, पासोड्या विठोबा, निवडुंगा विठोबा, तुळशीबाग विठ्ठल मंदिर, झांजले विठ्ठल मंदिराबाहेर पहाटेपासूनच गर्दी झाली होती. पहाटेचे स्नान, महापूजा, महाभिषेक व भजन झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत भाविकांची गर्दी कायम होती. देवस्थानतर्फे भजन, कीर्तन व प्रवचन ठेवण्यात आले होते. काही ठिकाणी खिचडी, फळे, रोपे वाटप करण्यात आले. राजकीय, सामाजिक संघटना व स्वयंसेवी संस्थांतर्फे भाविकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले; तर विठ्ठलवाडीमध्ये राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भाविकांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात फ्लेक्‍सबाजी केली.

जयघोषाने दुमदुमली विठ्ठलवाडी 
धायरी - विठ्ठल-रखुमाई देवस्थानतर्फे पहाटे महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. शहराच्या सर्व भागातून भाविक येथे आले होते. मंदिरासमोर राष्ट्रीय कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. सतीश मिसाळ ट्रस्टतर्फे भाविकांना खिचडी वाटप करण्यात आली. या वेळी आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुक्‍ता टिळक, बाबा मिसाळ, ज्योती गोसावी, मानसी देशपांडे आदी उपस्थित होते. स्वामी बॅग्ज व शांतिनिकेतन संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते भाविकांना रोपांचे वाटप करण्यात आले. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष कुमार गोसावी, आमदार भीमराव तापकीर, मनीषा नागपुरे, रूपाली चाकणकर, राहुल जगताप, दीपक परदेशी उपस्थित होते. शशितारा प्रतिष्ठान व नगरसेवक श्रीकांत जगतापतर्फे मोफत रिक्षा सेवा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे चप्पल स्टॅंडची सेवा देण्यात आली. वृत्तपत्र विक्रेता संघटनेने राजगिरा लाडू वाटप करण्यात आले.
 
भाविकांची गर्दी
औंध - देवस्थानच्या महिला भजनी मंडळातील सदस्यांच्या हस्ते पहाटे महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दिवसभर मंदिरामध्ये भजन, कीर्तनाचा कार्यक्रम होता. यात युवक-युवतींचा सहभाग लक्षणीय होता. देवस्थानतर्फे भाविकांना खिचडी वाटप करण्यात आले. याबरोबरच महिला भजनी मंडळांनी दिवसभर भजन, कीर्तन सादर केले. देवस्थानचे विश्‍वस्त राहुल जुनवणे यांनी भाविकांचे स्वागत केले.      

विठ्ठलमूर्तीचे आकर्षण
कात्रज - नानासाहेब पेशवे जलाशयाकाठी उभारलेली २६ फुटी विठ्ठल मूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. आषाढी एकादशीनिमित्त ज्येष्ठ भाविकांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर नगरसेवक वसंत मोरे यांच्या हस्ते भाविकांचा सन्मान करण्यात आला. भजनी मंडळांपासून ते शालेय दिंड्यामधील भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांना खिचडी व फराळ देण्यात आला.