देखणा नसलो तरी ‘पॉप्युलर’ झालो

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

पुणे -‘‘मराठी चित्रपटातील ‘हिरो’ला सुंदर चेहरा नाही. त्यामुळे मलाच काय दादा कोंडके, निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डे अशा अनेक अभिनेत्यांना ‘सुंदर चेहऱ्याचा अभिनेता’ म्हणता येणार नाही. तरीसुद्धा आम्ही ‘पॉप्युलर’ झालो. याचे एकमेव कारण म्हणजे आमचा अभिनय. आपल्या प्रेक्षकांना ‘दिसता कसे’, यापेक्षा ‘अभिनय करता कसा’ हे महत्त्वाचे वाटते’’, असे मत अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले.

बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने बालगंधर्व परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमात अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यासोबत सुधीर गाडगीळ यांनी संवाद साधला. यानिमित्ताने दोघांची चित्रपट कारकीर्द तर उलगडत गेलीच, शिवाय पडद्यामागची सोबतही उलगडत गेली. मला लहानपणी तबला वाजवण्याचा नाद होता. तबल्यावर बोटे आपोआप रेंगाळायची; पण तबला रीतसर शिकलो असतो, तर अभिनेता झालो नसतो, असे सांगून अशोक सराफ म्हणाले, ‘‘माझ्यावर कॉमेडी’चा शिक्का बसल्यामुळे तशाच प्रकारच्या भूमिका मला मिळत गेल्या आणि त्या कराव्याही लागल्या; पण विजया मेहता यांच्यामुळे ‘हमीदाबाईची कोठी’ नाटक करायला मिळाले. त्यामुळे काहीतरी वेगळे सादर करता आले. विजयाबाई आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यामुळे मला ‘शिस्त काय असते’ हे समजले. आजवरील कारकिर्दीत ‘हिरो’ आणि ‘कॅरॅक्‍टर आर्टिस्ट’ असा भेद कधीच केला नाही. दोन्ही प्रकारची कामे तितक्‍याच आवडीने करत आलो.’’ 

भातुकलीसारखा संसार ‘एन्जॉय’ केला
‘‘धूमधडाका’ चित्रपट आला आणि त्यानंतर माझे ‘करिअर’ धूमधडाक्‍यात सुरू झाले. १९८४ ते ८९ या काळात तीसहून अधिक चित्रपट, वेगवेगळी नाटके आली; पण १९८९ नंतर मी गायब झाले. याला कारणीभूत अशोक सराफ हे आहेत’’, असे मिस्कील शैलीत सांगून निवेदिता म्हणाल्या, ‘‘एखाद्या मुलीने भातुकली ‘एन्जॉय’ करावी, तसा मी माझा संसार ‘एन्जॉय’ केला. लग्नानंतर १४ वर्षे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले नाही. मुलांचा सांभाळ करणे, मला महत्त्वाचे वाटले; पण मुले मोठी झाल्यानंतर पुन्हा चित्रपटात आले.’’