'अष्टविनायक विकास आराखडा' मंजुरीसाठी राज्य सरकारकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

पुणे - अष्टविनायक गणपतींपैकी पाच गणपती देवस्थाने पुणे जिल्ह्यात आहेत. त्या ठिकाणी सुशोभीकरण आणि विविध विकासकामे करण्यासाठी "अष्टविनायक गणपती विकास आराखडा' तयार करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे 110 कोटी 47 लाख रुपयांचा निधी अपेक्षित असून, हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गुरुवारी दिली.

'अष्टविनायक गणपती देवस्थानांमध्ये मोरगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव हे गणपती देवस्थान मंदिरे पुणे जिल्ह्यात आहेत. या मंदिर परिसर आणि आसपासच्या परिसरातील रस्ते, स्वच्छतागृहे, वीजपुरवठा केंद्रे, सभागृहे, प्रवेशकमान, सीसीटीव्ही, महाप्रसादगृहे, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प आदी विविध विकासकामे करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी एकूण 110 कोटी 47 लाख रुपयांचा निधी लागणार आहे.

यामध्ये "महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ' (एमटीडीसी) आणि "कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे' (सीओईपी) यांच्याकडून हा आराखडा तयार करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधींसह देवस्थानचे विश्‍वस्त, पंचायत समिती सदस्यांच्या सूचना घेण्यासाठी प्रांताधिकारी स्तरावर बैठका घेऊन त्या सूचनांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. अंतिम आराखडा राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामांना सुरवात केली जाईल,'' असे राव यांनी सांगितले.

देवस्थाननिहाय निधीचा तपशील -
1) मोरगाव - 22 कोटी 87 लाख रुपये
2) थेऊर - 20 कोटी 25 लाख रुपये
3) लेण्याद्री - 24 कोटी 12 लाख रुपये
4) रांजणगाव - 20 कोटी 24 लाख रुपये
5) ओझर - 22 कोटी 99 लाख रुपये
एकूण निधी - 110 कोटी 47 लाख रुपये