पुण्यात होणार स्वयंचलित हवामान केंद्र

पुण्यात होणार स्वयंचलित हवामान केंद्र

पुणे - वातावरणातील प्रत्येक घटकाच्या नोंदी टिपण्यासाठी आवश्‍यक असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांतील उपकरणांसाठी आता परदेशांवर अवलंबून राहावे लागणार नाही, कारण या उपकरणांची निर्मिती पुण्यात सुरू होणार आहे. त्यामुळे देशाचे बहुमूल्य परकीय चलन वाचणार असून, खऱ्या अर्थाने हवामान खाते मेक इन इंडियाच्या मार्गावर जाण्यासाठी पावले उचलू लागले आहे.

संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ‘स्वयंचलित हवामान केंद्र’ (एडब्ल्यूएस) तयार करण्याच्या दृष्टीने हवामान खात्याने वेगाने तयारी सुरू केली आहे. देशात ‘एडब्ल्यूएस’चे जाळे निर्माण केल्याने वातावरणाची माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे वातावरणातील प्रत्येक घटकाची अद्ययावत माहिती शास्त्रज्ञांना उपलब्ध होणार आहे.

देशाच्या वेगवेगळ्या भागांत सध्या ६७५ ‘एडब्ल्यूएस’ उपकरणे बसविली आहेत. पुण्यात १६ ठिकाणी आहेत. मात्र ती परदेशी आहेत. त्या माध्यमातून तापमान, पर्जन्यमान, वाऱ्याची दिशा, त्याचा वेग अशी वातावरणातील इत्थंभूत अद्ययावत माहिती हवामान शास्त्रज्ञांपर्यंत नियमित पोचविण्यात येत आहे. गेल्या सात वर्षांपासून ‘एडब्ल्यूएस’ हवामान खात्यात वापरण्यात येत आहे. मात्र, त्याची संगणकप्रणाली, उपकरणे यासह त्याला आवश्‍यक तंत्रज्ञान परदेशातून आयात केले आहे. एका ‘एडब्ल्यूएस’साठी मोठी रक्कम खर्च करावी लागते. त्यातून मार्ग काढण्यासाठी स्वदेशी बनावटीचे ‘एडब्ल्यूएस’ तयार करण्याच्या दृष्टीने हवामान खात्याने ठोस पावले उचलली आहेत. 

या बाबत भारतीय हवामान खात्याचे उपमहासंचालक (जमिनीवरील उपकरणे) राजेश माळी म्हणाले, ‘‘सध्या उपग्रहाद्वारे हवामानाच्या माहितीची देवाण-घेवाण होते. दिवसातून ठराविक वेळेची माहिती या माध्यमातून शास्त्रज्ञांना मिळते. त्या तुलनेत ‘एडब्ल्यूएस’च्या नवीन उपकरणांमुळे दिवसभर अद्ययावत माहितीचा ओघ शास्त्रज्ञांना मिळत असतो. वातावरणातील घडामोडींची जलद आणि अचूक माहिती यातून मिळते.’’

सध्या हवामान खात्यात वापरण्यात येणारी जमिनीवरील सर्व उपकरणे पुण्यात तयार केली जातात. येथून ती देशाच्या विविध भागात पाठविली जातात. त्यामुळे भारतीय बनावटीचे ‘एडब्ल्यूएस’ तयार करण्याच्या कामात पुणे आघाडी घेत आहे. त्यासाठी आवश्‍यक संगणकप्रणाली विकसित करण्यात येत आहे. त्याला पूरक असलेल्या तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. स्वदेशी बनावटीच्या ‘एडब्ल्यूएस’मुळे अर्थातच देशाच्या परकीय चलनात बचत होईल. तसेच, ‘एडब्ल्यूएस’ची संख्या वाढल्याने हवामान अंदाजासाठी आवश्‍यक वातावरणातील घटकांची अद्ययावत माहिती शास्त्रज्ञांना मिळण्याची यंत्रणा सक्षम होणार आहे, असा विश्‍वास माळी यांनी व्यक्त केला. 

‘एडब्ल्यूएस’चे महत्त्व...
स्थानिक पातळीवर अचूक हवामान अंदाजासाठी तेथील वातावरणाची माहिती आवश्‍यक असते. स्वयंचलित हवामान केंद्रांमधून ही माहिती शास्त्रज्ञांना मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारे सुमारे तीन हजार केंद्र देशात उभारण्याची गरज आहे. त्यासाठी हवामान खात्याने स्वदेशीचा नारा दिला आहे. 

सॅटेलाइट टू सिम कार्ड
सध्या वातावरणाची माहिती उपग्रहाच्या माध्यमातून संकलित केली जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते, वेळ लागतो, मनुष्यबळावर खर्च करावा लागतो. त्याऐवजी आता सीम कार्डचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे हवामानाची माहिती जलदगतीने शास्त्रज्ञांना मिळत आहे.

६७५ - देशातील स्वयंचलित हवामान केंद्र

३००० - अपेक्षित स्वयंचलित हवामान केंद्र

६७५ - उपग्रहाद्वारे माहिती संकलन करणारी देशातील केंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com