265 रिक्षाचालकांचे परवाने निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

पुणे - भाडे नाकारणे, जादा भाडे आकारल्याप्रकरणी शहराच्या विविध भागांतून जवळपास 265 रिक्षाचालकांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच, 706 रिक्षाचालकांवर कारवाई करून एक लाख 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, दत्तवाडी, विश्रामबाग, फरासखाना आणि खडकी पोलिस ठाण्याच्या परिसरातील रिक्षांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारतात, उपनगरातील भाड्यासाठी भरदिवसा परतीचे अर्धे भाडे मागतात, मीटरपेक्षा जादा भाडे आकारतात, उद्धट वर्तन करतात, अशा तक्रारी प्रवाशांकडून आल्या होत्या. त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जून महिन्यापासून वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांविरोधात कारवाई सुरू केली. 

पोलिस कर्मचारी सामान्य वेशात प्रवासी म्हणून रिक्षाचालकांना अमुक ठिकाणी जायचे आहे असे सांगतात. त्यावर रिक्षाचालकाने भाडे नाकारले किंवा मीटरपेक्षा जास्त रकमेची मागणी केली, तर थेट कारवाई केली जात आहे. तसेच, संबंधित रिक्षाचालकाचा परवाना निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविला जातो. 

शिवाजीनगर भागात 156 रिक्षांवर कारवाई 
शिवाजीनगर येथे बस व रेल्वे स्थानक असल्याने प्रवाशांची संख्या येथे अधिक असते. या भागामध्ये सर्वाधिक 156 रिक्षाचालकांवर, त्यापाठोपाठ कोरेगाव पार्क हद्दीत 80 रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे. सर्वात कमी तक्रारी सहकारनगर, स्वारगेट, भारती विद्यापीठ, कोंढवा, विश्रांतवाडी, चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत.