सेवा विस्तारासाठी स्वायत्तता द्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

पुणे - शहरासह देश-विदेशात रुग्णांची सेवा करणाऱ्या असंख्य डॉक्‍टरांना वैद्यकीय धडे देणाऱ्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयास स्वायत्तता मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. अतिविशेष उपचार, प्रगत वैद्यकीय शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या व्यवस्थापनासाठी ही स्वायत्तता महत्त्वाची असल्याचे राज्य सरकारला दिलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे. 

पुणे - शहरासह देश-विदेशात रुग्णांची सेवा करणाऱ्या असंख्य डॉक्‍टरांना वैद्यकीय धडे देणाऱ्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयास स्वायत्तता मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. अतिविशेष उपचार, प्रगत वैद्यकीय शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या व्यवस्थापनासाठी ही स्वायत्तता महत्त्वाची असल्याचे राज्य सरकारला दिलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे. 

पुणे हे देशातील आठव्या क्रमांकाचे, तर राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. पुण्याबरोबरच शेजारील पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा मिळून ७५ लाखांवर लोकसंख्या गेली आहे. पुणे परिसरातील वाढते औद्योगीकरण, माहिती तंत्रज्ञानाचा होणार विकास यामुळे कुशल मनुष्यबळ, तरुण वर्ग पुण्यात आकर्षित होत आहे. तसेच बांधकाम व्यवयासह इतर उद्योगांचा विकसित होत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकही पुणे आणि परिसरात येत आहेत. त्याच वेळी या लोकसंख्येसाठी आवश्‍यक वैद्यकीय सुविधा त्यांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर स्वायत्तता मिळाल्याने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात अतिविशेष रुग्णसेवा विकसित करता येईल, असा विश्‍वास या प्रस्तावात व्यक्त करण्यात आला आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून पुण्यात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी हे रुग्ण मुंबईमध्ये उपचारासाठी जाण्यास प्राधान्य देत होते. ससून रुग्णालयात अद्ययावत नवजात अर्भक विभाग, वैद्यकीय अतिदक्षता विभाग, डायलिसिस केंद्र, ट्रॉमा सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. उद्योगांची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) आणि सरकारी निधी या माध्यमातून ससून रुग्णालयाचा कायापालट करण्यात आला आहे. त्याच वेळी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन प्रकल्प सुरू आहेत. दरवर्षी दहा कोटी रुपयांपर्यंत आंतरराष्ट्रीय संशोधन निधी महाविद्यालयाला मिळत आहे. एवढा भरीव निधी मिळणाऱ्या देशभरात महाविद्यालयांमध्ये बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय हे पहिल्या पाचमध्ये आहे. त्यामुळे या संशोधनाला चालना मिळण्यासाठी महाविद्यालयाची स्वायत्तता आवश्‍यक असल्याचे या प्रस्तावात स्पष्ट केले आहे. 

कर्नाटक व गुजराजमध्ये महाविद्यालयांच्या स्वायत्ततेचा प्रयोग यशस्वी झाला आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात सध्या तीन अतिविशेष उपचार सेवा उपलब्ध आहे. त्याचा विस्तार व्हावा, फोलोशिप अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ज्ञानवृद्धी व संशोधनाद्वारे ज्ञान निर्मिती करण्यासाठी स्वायत्तता आवश्‍यक आहे. स्वायत्ततेमुळे हे काम अधिक गतिमान होईल.
-डॉ. अजय चंदनवाले,  अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय