आज शाहिरांना रडावे लागतेय: बाबासाहेब पुरंदरे

सुशांत सांगवे
बुधवार, 24 मे 2017

शाहिरांना कमी लेखू नका. भिकारीही समजू नका; पण त्यांचा, किर्तनकारांचा, प्रवचनकारांचा मान ठेवा.

पुणे - 'शिवपूर्वकाळ आणि शिवकाळात महाराष्ट्र जागा करण्याचे काम शाहिरांनी केले. त्या काळात शाहिरांचा गौरव झाला; पण आज शाहिरांना रडावे लागत आहे, अशी स्थिती आहे", अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी व्यक्त केली

पुणे महापालिकेचा 'लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार' शाहीर हेमंत मावळे आणि लोककलावंत प्रभा शिवणेकर यांना महापौर मुक्ता टिळक आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, गोपाळ चिंतल आदि उपस्थित होते.

पुरंदरे म्हणाले, "शाहिरांना कमी लेखू नका. भिकारीही समजू नका; पण त्यांचा, किर्तनकारांचा, प्रवचनकारांचा मान ठेवा."

मावळे म्हणाले, "शहरात शाहिरांसाठी स्वतंत्र सदन असावे, सध्या हक्काची एकही जागा नाही. स्वतःचे घरसुद्धा नाही. धडपडणाऱ्या कलावंतांना पालिकेने बळ द्यावे."

या वेळी सीमा पाटील (शाहीर), पद्मजा कुलकर्णी (भारूड), वैशाली गांगवे, रेखा परभणीकर (नृत्यांगना), बुवा डावळकर, ज्ञानेश्वर बंड (ढोलकी), गोविंद कुडाळकर (तबला), आशाताई मुसळे, शकुंतला सोनावणे (गायिका), विठ्ठल थोरात (वगनाट्य) यांनाही गौरवण्यात आले.