बाजीराव रस्त्याची कोंडी सुटेना !

बाजीराव रस्त्याची कोंडी सुटेना !

पुणे - बेशिस्त वाहनचालक, रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग, रस्ता ओलांडण्यास मनाई असतानाही बेधडकपणे डाव्या-उजव्या बाजूने येणारी वाहने, माल उतरविण्यासाठी दारात वाहने उभी करणारे स्थानिक दुकानदार, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या राहणाऱ्या रिक्षा, तीनचाकी व चारचाकी गाड्या आणि अरुंद रस्त्यातून वाट काढताना लागलेल्या बसगाड्यांच्या रांगा... यामुळे दक्षिण-उत्तर पुण्याला जोडणाऱ्या बाजीराव रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सुटता सुटेना ! 

अभिनव कला महाविद्यालयासमोरील चित्रकलाचार्य एन. ई. पुरम चौक ते शनिवारवाड्यासमोरील डॉ. केशव बळिराम हेडगेवार चौकापर्यंत दररोजच सकाळी साडेनऊ ते दुपारी एक आणि सायंकाळी साडेचार ते साडेआठ-नऊ दरम्यान वारंवार वाहतूक ठप्प होते. पूरम चौक, शनिपार चौक, अप्पा बळवंत चौक या तीन प्रमुख चौकांमध्येच सिग्नल आहेत. सिग्नलचे सिंक्रोनायझेशन पंधरा, तीस आणि पंचेचाळीस मिनिटांचे आहे. त्यानुसार पोलिस नियोजन करतात. मात्र रस्त्याच्या डाव्या-उजव्या बाजूच्या उपरस्त्यांपैकी काही रस्त्यांवर डाव्या बाजूने वाहने चालविण्याचे फलक लावले आहेत. पी वन, पी टू चेही फलक आहेत. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी या तिन्ही चौकांमध्ये वाहतूक पोलिस उभे असतात. स्थानिक दुकानदार, रहिवासी यांची दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी असतात. पोलिसांनी वारंवार सांगूनही त्यात फारसा फरक पडलेला दिसत नाही. 

माडीवाले कॉलनी, सुभाषनगर, वाडिया हॉस्पिटलकडून बाजीराव रस्त्यावर डाव्या-उजव्या बाजूने वाहने येतात. तसेच चिंचेच्या तालिमीकडे जाणाऱ्या मधुकर चिंतामणी पोतनीस रस्ताच्या लगत अरुंद रस्त्यावरून वाहने मुख्य रस्त्यावर येतात. नातूबागेतल्या श्री. म. माटे रस्ता, निंबाळकर तालीम चौकाकडून लोणीविके दामले आळीकडून व चिमण्या गणपती चौक, वंदेमातरम्‌ चौकाकडून वाहने या रस्त्याला येऊन मिळतात. तर महात्मा फुले मंडई आणि शुक्रवार पेठेतील दिनकरराव जवळकर मार्ग, दाजीसाहेब नातू रस्ता, राजा दिनकर केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, न. चि. केळकर रस्ता, उभा शनिवार रस्ता (छत्रे पथ) येथून येणारी वाहनेही या रस्त्याला येऊन मिळतात. परंतु याच रस्त्यावर पाच शाळा आहेत. त्यामुळे शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेतही वाहनांची कोंडी होते.

एकाआड एक रस्त्यावर एकेरी वाहतूक हवी 
शिवाजी रस्त्याच्या तुलनेने बाजीराव रस्त्यावर वाहतुकीची कोंडी अधिक होते. याचे मुख्य कारण बाजीराव रस्त्याला अनेक लहान रस्ते छेदतात. त्यावर उपाय काढण्यासाठी एकाआड एक रस्त्यावर एकेरी वाहतूक करणे. त्यामुळे थेट बाजीराव रस्त्यावर येणाऱ्या रस्त्यांची संख्या निम्मी होईल. हा उपाय योजण्यात आला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सर्रास नो एंट्रीतून वाहने रस्त्यावर येत आहेत.

सकाळ प्रतिनिधींचा अनुभव  
वेळ सकाळी दहा वाजताची  
बेशिस्त वाहनचालक 
पूरम चौक ते डॉ. हेडगेवार चौकापर्यंत येण्यास लागली चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे. 
रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, तीनचाकी, चारचाकी गाड्यांचे बेशिस्त पार्किंग.
पोलिसांसमोरच बिनधास्तपणे वाहनचालक सिग्नल ओलांडतात 
अरुंद रस्त्यावर बसगाड्यांची लागते रांग.
पर्यायाने वाहतूक होते ठप्प 
झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने उभी केली जातात. 
पादचाऱ्यांना चालणे अवघड
पदपथांवर खाद्यपदार्थांच्या गाड्यांचे अतिक्रमण. 
शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत रस्त्यावर गर्दीच गर्दी. 

असा सुटू शकतो प्रश्‍न
खालील चौकाला मिळणाऱ्या उपरस्त्यांची वाहतूक एकेरी करावी 
नातूबाग चौक
नवा विष्णू चौक 
पं. भास्करबुवा बखले चौक 
उपरस्त्यांवरून येणाऱ्या वाहनचालकांना  पोलिसांनी दंड आकारावा 
पूरम चौक, शनिपार चौक, अप्पा बळवंत चौकात किमान चार वाहतूक पोलिस असावेत

शाळा सुटतेवेळी प्रवेशद्वारांवर सुरक्षारक्षक उभे करावेत 
झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी राहिल्यास  पोलिसांनी दंड आकारावा 
सिग्नलची वेळ निश्‍चित करावी 
एकेरी पार्किंगची व्यवस्था करावी 
नो पार्किंगमध्ये वाहने पार्क केल्यास दंड आकारावा
स्थानिक दुकानदारांनी मालाच्या गाड्या जास्तवेळ रस्त्यावर उभ्या करू नयेत 
पथारी व्यावसायिकांना हटवावे  

चौकांमधील क्राँसिंगमधून जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. परवानगी नसतानाही नागरिक वेडी-वाकडी वाहने चालवतात. त्यामुळे वाहनांची गती मंदावते आणि त्या चौकांमध्ये कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलिस नसतात. प्रत्येक चौकात वाहतूक पोलिस आणि वॉर्डन असावा. 
- नितीन अगणे (रिक्षाचालक)

वाहतूक कोंडीचे मुख्य कारण म्हणजे पदपथांवरील अतिक्रमण आणि रस्त्याच्या दुतर्फा ‘नो पार्किंग’मध्ये बेशिस्तपणे उभी असणारी वाहने. अनेकवेळा चारचाकी चालक, रिक्षावाले, पीएमपी बस रस्त्याच्या मधोमध थांबतात. यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा पादचाऱ्यांनाही नेहमीच त्रास होत असतो.
- मंगेश साळेकर (वृत्तपत्र विक्रेता)

बाजीराव रस्त्यावर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जाते. मात्र, कारवाई करून पुढे जाताच नागरिक पुन्हा वाहने पार्क करतात. यावरून पोलिस आणि नागरिकांमध्ये बऱ्याचदा वाद होतात. दुकानदारांसाठी वाहनांमध्ये माल चढविणे-उतरविण्यासाठी वेळ निश्‍चित केली आहे. दुकानदारांकडून त्याचे काटेकोर पालन होणे अपेक्षित आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्यावर पार्किंगबाबत पी-१ आणि पी-२ ची कडक अंमलबजावणी करण्यात येईल. 
- सूरज पाटील, सहायक निरीक्षक, विश्रामबाग वाहतूक विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com