चरित्रातून उलगडणार डॉ. कोयाजींचे कर्तृत्व

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

जन्मशताब्दीनिमित्त विशेष पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू

जन्मशताब्दीनिमित्त विशेष पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू
पुणे - महिला आणि बाल आरोग्य क्षेत्राला मोठे योगदान देणाऱ्या डॉ. बानू कोयाजी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने "बानूबाई' हे चरित्रपर पुस्तक "सकाळ प्रकाशन' प्रसिद्ध करत आहे. पुण्यातील केईएम हॉस्पिटल आणि "सकाळ'च्या माजी संचालक असलेल्या डॉ. कोयाजी यांची जन्मशताब्दी गुरुवारी (ता. 7) आहे.

या पुस्तकाची संकल्पना, संशोधन आणि लेखन डॉ. बानू कोयाजी यांच्यासोबत काम केलेल्या डॉ. प्रतिभा कुलकर्णी यांचे आहे.

बानूबाई या नावाने परिचित असणाऱ्या डॉ. कोयाजी यांनी आपल्या कार्यकाळात चाळीस रुग्णांची व्यवस्था असणाऱ्या केईएम हॉस्पिटलचा विस्तार 500 रुग्णव्यवस्थेइतक्‍या मोठ्या रुग्णालयात केला. वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, समस्या निराकरणासाठी त्यांनी "केईएम रिसर्च सेंटर'ची स्थापना केली.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी समाजसेवा विभाग निर्माण केला. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोचवण्यासाठी त्यांनी ग्रामीण आरोग्य क्षेत्रात नमुनादर्श ठरेल असा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील वढू येथे राबवला.
ग्रामीण आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर "रॅमन मॅगसेसे' पुरस्काराने केला गेला; तर भारत शासनाने त्यांना "पद्मभूषण' सन्मान देऊन गौरवले.

"सकाळ'चे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांनी बानूबाईंचा "सकाळ पेपर्स'च्या व्यवस्थापनामध्ये समावेश करून घेतला. नानासाहेबांच्या निधनानंतर बानूबाईंनी इतर संचालकांच्या मदतीने 1973 ते 1985 या काळात "सकाळ' सांभाळला आणि जोपासला.

बानूबाईंचे महत्त्वाकांक्षी आणि सहृदयी व्यक्तिमत्त्व, बानूबाईंनी आपल्या कार्यकाळात मोठी कामे कशी उभी केली याचे चित्रण डॉ. प्रतिभा कुलकर्णी यांच्या "बानूबाई' या पुस्तकातून उलगडते. येत्या 17 तारखेला प्रकाशित होणारे रु. 200 किमतीचे पुस्तक 30 टक्के प्रकाशनपूर्व सवलतीत, रु. 140 मध्ये, उपलब्ध आहे. प्रकाशनपूर्व सवलतीचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या "सकाळ' कार्यालयात किंवा www.sakalpublications.com या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी 8888849050 किंवा 020- 24405678.