बारामती 'MIDC'मध्ये आगीत 12 लाखांचे नुकसान, जीवितहानी नाही

मिलिंद संगई
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

विरोधाभास अनुभवण्यास मिळाला...
एकीकडे बारामती एमआयडीसीच्या अग्निशामन केंद्रातील जवान संपूर्ण सुसज्ज सामग्रीनिशी आग विझविण्यासाठी आवश्यक वेश परिधान करुन आलेले होते तर दुसरीकडे नगरपालिकेचे जवान मात्र कोणत्याही साधनसामग्रीविना आग विझविण्याचे प्रयत्न करताना आज दिसले. या पूर्वीही अनेकदा नगरपालिकेच्या अग्निशामन यंत्रणेच्या आधुनिकीकरणाच्या गप्पा झाल्या, प्रत्यक्षात आजही कर्मचा-यांच्या जीवाशी खेळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी करताना आज दिसून आले. 

बारामती : येथील बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीतील निंबाळकर युनिटला आज दुपारी लागलेल्या भीषण आगीमध्ये बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 
सहकारी औद्योगिक वसाहतीत फाऊंड्री कास्टिंग तयार करताना जी बर येते त्या बरचे ग्राइंडिंग करण्याचे हे युनिट आहे. या युनिटमध्ये फर्नेसचा वापर केला जातो. आज गुरुवार असल्याने कारखान्याचे कामकाज बंद होते व कर्मचारीही उपस्थित नसल्याने सुदैवाने कसलीही जीवीतहानी झाली नाही. 

दुपारी बाराच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे फर्नेसने पेट घेतल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही मिनिटातच आगीने रौद्र रुप धारण केले व ज्वाळा व धूर आकाशाकडे झेपावू लागला. त्या नंतर बारामती नगरपालिका व एमआयडीसीच्या अग्निशामन दलाच्या गाड्या काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचल्या व त्यांनी अर्धा तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. 

आगीची जाणीव होताच अग्निशामक दलाला कळविण्यात आल्याने आग तुलनेने लवकर आटोक्यात आली. फर्नेसमुळे आगीचा भडका उडाला असण्याची शक्यता व्यक्त होते आहे. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत बारा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. एमआयडीसी व नगरपालिकेच्या अग्निशामन दलाच्या जवानांनी तातडीने ही आग विझविण्यासाठी धावपळ केल्यामुळे ही आग पसरली नाही. 'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

 

Web Title: pune news baramati midc fire damage