महावितरणच्या या 'कॉर्पोरेट' कार्यालयाचा राज्यभर डंका

ज्ञानेश्वर रायते
रविवार, 28 मे 2017

बारामती तालुक्‍यातील सांगवी येथील महावितरणचे शाखा अभियंता नितीन इंगोले आणि कार्यालयाच्या रचनेचे महावितरणने राज्य स्तरावर कौतुक केले असून, या महिन्यातील "विद्युत वार्ता' या मासिकातही सांगवी कार्यालयाची छायाचित्रे व लेख प्रसिद्ध करून असे कार्यालय सर्वत्र असावे, अशी अपेक्षा संजीवकुमार यांनी व्यक्त केली आहे.

बारामती : महावितरणची कंपनी होऊन 12 वर्षे उलटली; मात्र अजूनही स्थानिक कार्यालयांना कंपनीप्रमाणे कॉर्पोरेट लूक आलेला नाही; मात्र बारामतीतील सांगवी येथील महावितरण कार्यालयाचा आदर्श राज्यातील इतर कार्यालयांनी घ्यावा असाच आहे. हा सल्ला खुद्द महावितरणचे अध्यक्ष संजीवकुमार यांनीच दिला असून, सांगवीच्या कार्यालयाचा डंका राज्यभरात पोचवला आहे.

बारामती तालुक्‍यातील सांगवी येथील महावितरणचे शाखा अभियंता नितीन इंगोले आणि कार्यालयाच्या रचनेचे महावितरणने राज्य स्तरावर कौतुक केले असून, या महिन्यातील "विद्युत वार्ता' या मासिकातही सांगवी कार्यालयाची छायाचित्रे व लेख प्रसिद्ध करून असे कार्यालय सर्वत्र असावे, अशी अपेक्षा संजीवकुमार यांनी व्यक्त केली आहे.

सांगवी येथे महावितरणचे 25 वर्षांपूर्वी कार्यालय झाले. या कार्यालयात इतर कार्यालयांप्रमाणेच तुटलेल्या टेबल-खुर्च्या, स्वच्छतागृहाची दुरवस्था, भिंतीचे रंग उडालेले, बंद पडलेले मीटर व सर्व्हिस वायर्सचे ढीग इतरत्र पडले होते; मात्र परिमंडल कार्यालयात काम करून थेट शाखा कार्यालयात बदली झालेल्या नितीन इंगोले यांनी कार्यभार स्वीकारला आणि त्यांना धक्काच बसला.

परिमंडल कार्यालयात असे काही पाहण्यात नसल्याने ही अस्वच्छता त्यांनी दूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांबरोबर सुधारणेस सुरवात केली. कपाटे दुरुस्त करून घेतली. खिडक्‍यांना हिरव्या काचा, पडदे बसवले. दुरुस्त कपाटांमध्ये फाइल्स व्यवस्थित बसविल्या. स्वागत कमान दुरुस्त करून घेतली. कार्यालयात असणाऱ्या सर्व वस्तू, पिण्याच्या पाण्याचे जार, मॅट, परिसरात झाडे हे सर्व सुशोभीकरण स्वतःच्या व कर्मचाऱ्यांच्या पैशातून केले. मागील नऊ महिन्यापासून कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक सुटी वगळता इतर कधीही सुटी घेतलेली नाही. ग्राहकांच्या समस्या तातडीने सोडविण्यावर दिलेला भर यामुळे या कर्मचाऱ्यांसह इंगोले यांचाही सांगवीचे पदाधिकारी महेंद्र तावरे, बाळासाहेब तावरे व ग्रामस्थांनी सत्कार केला.

फोटो गॅलरी