बारामतीच्या वाहतुकीचा उडाला बोजवारा

मिलिंद संगई
बुधवार, 14 जून 2017

संयुक्त प्रयत्नच होत नाहीत
बारामती नगरपालिका, पोलिस, उपप्रादेशिक परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध विभागांनी एकत्र येत सातत्याने अतिक्रमण हटाव मोहिम राबविली तर त्याचा परिणाम दिसेल, मात्र संयुक्त प्रयत्न होतच नसल्याने बारामतीच्या वाहतूकीचा पार बोजवारा उडाला आहे. 

बारामती : आमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांची गाडी लावण्यासाठी कोणी जागा देईल का हो जागा... हे एखाद्या नाटकातील वाक्य नाही, तर हल्ली बारामतीतील व्यापाऱ्यांच्या तोंडी असलेले वाक्य आहे. शहरात नियमित सर्व प्रकारचे कर भरणाऱ्या छोट्या दुकानदारांची ही आर्त साद आहे. 

शहरात सध्या अतिक्रमणांच्या विळख्यांनी आणि बेलगामपणे कोठेही दुचाकी व चार चाकी वाहने पार्क करण्याच्या नागरिकांच्या सवयीने दुकानदारांच्या व्यवसायावरच विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्यातही मोठ्या दुकानातील कर्मचाऱ्यांच्या दुचाक्या सकाळी सात ते संध्याकाळी नऊ पर्यंत एकाच जागी असल्याने ग्राहकांच्या दुचाकी लावायला जागाच नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

व्यापारी संकुले उभारताना नकाशात पार्किंग दाखविलेल्या आणि प्रत्यक्षात तेथे गाळे काढून त्याची राजरोस विक्री केलेल्या सर्व बांधकाम व्यावसायिकांवर बारामती नगरपालिकेने कारवाई करण्याची आवश्यकता आता बोलून दाखविली जात आहे. 
शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर आज बारामती शहरातील वाहतूकीचा पार बोजवारा उडालेला होता आणि वाहतूक पोलिस मात्र कुठेच दिसत नव्हत. भिगवण, इंदापूर, गुनवडी व गांधी चौकादरम्यान अनेक ठिकाणी वारंवार वाहतूकीची कोंडी झाली मात्र ती दूर करायला पोलिस यंत्रणा कार्यान्वित नव्हती. 
रस्त्यांवर भर गर्दीच्या वेळेस अनेक प्रकारची अतिक्रमणे सर्रास नागरिकांना दिसतात मात्र नगरपालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करतो अशीच नागरिकांची तक्रार आहे. अनेक ठिकाणी रस्ते रिकामे केले अतिक्रमणे काढली तर वाहतूक सुरळीत होऊ शकते, गरज आहे ती इच्छाशक्तीने हे काम मार्गी लावण्याची. 
आज बारामतीच्या रस्त्यांवरुन जाताना दुचाकी वाहनचालकांना अक्षरशः कसरत करत मार्गक्रमण करावे लागले. अस्ताव्यस्त पार्किंग, कोठेही पार्क केलेल्या चार चाकी गाड्या, रस्त्यावर विक्रेत्यांनी ठाण मांडून बसणे आणि मन मानेल तेथे लावलेले व्यवसाय या मुळे बारामतीच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे.