भैरोबानाला परिसरात धबधबे अन्‌ जॉगिंग ट्रॅक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

पुणे - महापालिकेच्या धर्तीवर आता पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनानेही नाला सुशोभीकरणास प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात भैरोबा नाल्याचा संपूर्ण परिसर सुशोभित करणार आहे. त्यामध्ये छोट्या धबधब्यांपासून ते जॉगिंग ट्रॅक, सिनिअर सिटीझन पार्कचा समावेश असणार आहे. 

पुणे - महापालिकेच्या धर्तीवर आता पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनानेही नाला सुशोभीकरणास प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात भैरोबा नाल्याचा संपूर्ण परिसर सुशोभित करणार आहे. त्यामध्ये छोट्या धबधब्यांपासून ते जॉगिंग ट्रॅक, सिनिअर सिटीझन पार्कचा समावेश असणार आहे. 

दरवर्षी पावसाळ्यात भैरोबा नाल्यातून येणारे पाणी कॅंटोन्मेंटमधील काही वस्त्यांमध्ये शिरते. हा प्रकार टाळण्यासाठी नाल्याचे सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय बोर्डाच्या बैठकीमध्ये घेतला होता. त्याचवेळी नाल्याचे सुशोभीकरण करण्याची संकल्पना बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी मांडली होती. त्यास बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर राजीव सेठी, उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांच्यासह सर्व सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाठिंबा दिला होता. आता ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी बोर्डाच्या अभियांत्रिकी विभागाने सुरवात केली आहे. त्यानुसार सुशोभीकरणाचा प्राथमिक आराखडाही तयार केला आहे. त्याचबरोबर नाल्याचे सर्वेक्षण करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

कॅंटोन्मेंटच्या हद्दीतील नेताजीनगर ते घोरपडी या सात किलोमीटरच्या परिसरातून भैरोबा नाला जातो. नाल्याचे सुशोभीकरण करण्याबरोबरच तेथे तरुणांसाठी जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी छोटी उद्याने, वृद्धांसाठी "सिनिअर सिटीझन पार्क' यांसारख्या असंख्य सोयीसुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

या संदर्भात गायकवाड म्हणाले, ""भैरोबा नाल्याचा सात किलोमीटरचा परिसर आहे. त्याच्या सुशोभीकरणाची संकल्पना डॉ. यादव यांनी मांडली होती. सुशोभीकरणामुळे भैरोबा नाल्याचे चित्र बदलणार आहे. त्याचा उपयोग कॅंटोन्मेंटमधील रहिवाशांसाठी होणार आहे. या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार आहे. कॅंटोन्मेंट प्रशासन निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.''