भाजपची स्वाक्षरी मोहीम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

पुणे -  नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शहरात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पक्षातर्फे जंगली महाराज रस्त्यावर संभाजी उद्यानाजवळ आयोजित केलेल्या उपक्रमात अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. 

पुणे -  नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शहरात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पक्षातर्फे जंगली महाराज रस्त्यावर संभाजी उद्यानाजवळ आयोजित केलेल्या उपक्रमात अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. 

नोटाबंदीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस; तसेच अन्य काही पक्ष व संघटनांतर्फे बुधवारी शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. त्याची कुणकूण लागल्यावर दोन दिवसांपूर्वीच भाजपने स्वाक्षरी मोहिमेचे नियोजन केले. त्यानुसार शहरात सुमारे ५० ठिकाणी फलक उभारून त्यावर नोटाबंदीला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली. 

संभाजी उद्यानाजवळ आयोजित स्वाक्षरी मोहिमेत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार विनय सहस्रबुद्धे यांनीही भाग घेतला. या प्रसंगी शहराध्यक्ष गोगावले, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, सरचिटणीस उज्ज्वल केसकर आणि काही नगरसेवक उपस्थित होते. सकाळी सुमारे साडेदहा वाजता सुरू झालेला हा उपक्रम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच बस स्थानके, शाळा-महाविद्यालये, प्रमुख चौक, वर्दळीचे रस्ते; तसेच उपनगरांतही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. नोटाबंदीच्या निर्णयाची पार्श्‍वभूमी आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन सहस्रबुद्धे यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयात झाले. या प्रसंगी गोगावले, शिरोळे यांच्यासह प्रा. विनायक आंबेकर, गिरीश खत्री आदी उपस्थित होते. 

भाजपच्या कसबा विधानसभा मतदारसंघातर्फे टिळक रस्त्यावर आयोजित स्वाक्षरी मोहिमेचे नियोजन नगरसेवक राजेश येनपुरे; तसेच प्रमोद कोंढरे, छगन बुलाखे, राजू परदेशी, संजय देशमुख, अरविंद कोठारी, उमेश चव्हाण, पुष्कर तुळजापूरकर, वैशाली नाईक, अश्‍विनी पवार यांनी केले. या मोहिमेत परिसरातील स्थानिक नगरसेवकांनीही भाग घेतला.