लाटणे मोर्चा काढल्याची भाजपला चिंता नाही - रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पुणे - 'लाटणे घेऊन कोणी मोर्चा काढला तरी भारतीय जनता पक्षाला काहीही फरक पडत नाही. पक्षवाढीसाठी अशी आंदोलने करावीच लागतात,' अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या मोर्चाची खिल्ली उडवली. काही माध्यमांना या मोर्चाचे कौतुक वाटत असले, तरी भाजपला त्याचे सोयरसुतक नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरून परतल्यावर नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्ष संघटनेच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते.

पक्षवाढीसाठी काही पक्ष आंदोलन करतात. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असे शिवसेनेचे नाव न घेता सांगत दानवे म्हणाले, की राणे यांची अमित शहा यांच्यासमवेत बैठक झाली आहे; परंतु मुख्यमंत्री परतल्यावर याबाबत निर्णय होईल. आगामी काळात राज्यातील 90 हजार बूथ सक्षम करण्यासाठी पक्षाने मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी 288 विस्तारक सर्व विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन महिन्यांपासून कार्यशील झाले आहेत. पक्षाने विकसित केलेल्या ऍपद्वारे बूथ सक्षम करण्याच्या योजनेवर मुंबईतून देखरेख करण्यात येत आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पक्षाला 11 आमदारांची मते जादा मिळाली आहेत. त्यामुळे अन्य आमदार, खासदारांचा भाजपकडे ओढा कायम आहे. याबाबत योग्यवेळी पत्ते उघड करू, असे दानवे यांनी म्हटले.

पेट्रोलवरील सेस कायम राहणार
दुष्काळ असल्यामुळे गेल्या वर्षी पेट्रोलवर सेस लागू लावण्यात आला होता. यंदा दुष्काळ नसल्यामुळे सेस मागे घेणार का? या प्रश्‍नावर, दुष्काळ सांगून येत नाही. त्याचा सामना करण्याची तयारी हवी. त्यामुळे सेस मागे घेतला जाणार नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

रावसाहेब दानवे म्हणाले
- मंत्र्यांच्या कामाबद्दल प्रदेशाध्यक्ष म्हणून मी समाधानी
- नाना पटोले परखड मते मांडण्यासाठी प्रसिद्ध
- एकनाथ खडसे यांची चौकशी पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री निर्णय घेणार
- भाजपने केलेल्या सर्वेक्षणात पक्षाच्या जागा वाढणार
- संजय काकडे यांचे "बावळट'पणाबाबतचे वक्तव्य वाचले नाही