भूसंपादनाच्या प्रक्रियेत उड्डाण पूल ‘लटकला’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

शहराच्या पश्‍चिमेकडील वाहतूक सुरळीत करण्यासाठी चांदणी चौकात तीन मजली उड्डाण पूल होणार आहे. त्याच्या उभारणीसाठी निधीचा प्रश्‍न निकालात निघाला असला, तरी पुलाच्या उभारणीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया रेंगाळलेली आहे. त्यामुळे पुलासाठी निविदा तयार असूनही काम रखडले आहे. मात्र, येत्या पंधरा दिवसांत प्रकल्प बाधितांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर अंतिम प्रशासकीय प्रक्रियेला गती येईल, असा दावा महापालिकेने केला आहे. 

शहराच्या पश्‍चिमेकडील वाहतूक सुरळीत करण्यासाठी चांदणी चौकात तीन मजली उड्डाण पूल होणार आहे. त्याच्या उभारणीसाठी निधीचा प्रश्‍न निकालात निघाला असला, तरी पुलाच्या उभारणीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया रेंगाळलेली आहे. त्यामुळे पुलासाठी निविदा तयार असूनही काम रखडले आहे. मात्र, येत्या पंधरा दिवसांत प्रकल्प बाधितांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर अंतिम प्रशासकीय प्रक्रियेला गती येईल, असा दावा महापालिकेने केला आहे. 

शहराचे पश्‍चिमेचे प्रवेशद्वार, अशी ओळख असलेल्या चांदणी चौकातील असुरक्षित वाहतुकीमुळे येथे उड्डाण पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. ‘सकाळ’नेही त्याबाबत वारंवार आवाज उठविला आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या बहुमजली उड्डाण पुलाचा खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) करेल, अशी घोषणा केली. निधीचा प्रश्‍न मार्गी लागल्यामुळे पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला, असे वाटत होते. परंतु, प्रशासकीय प्रक्रियेत हा पूल सध्या अडकला आहे. 

पुलाच्या उभारणीसाठी महापालिकेने आराखडा तयार करून ‘एनएचएआय’कडे सादर केला. त्यांनी त्यात सुधारणा करून अंतिम आराखडा तयार केला आहे. या पुलासाठी सुमारे ४२१ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा पूल ‘एनएचएआय’मार्फत करण्यात येणार आहे. तर, शहराच्या हद्दीतील सर्व्हिस रस्ते महापालिका प्रशासन करणार आहे. कोथरूडवरून आल्यावर वाहनचालकांना मुळशी, पाषाण, मुंबईकडे जाता येईल; तर बाह्यवळण रस्त्यावरून आल्यावर वाहनचालकांना कोथरूड, पाषाण, मुळशीकडे जाता येईल, अशा पद्धतीने रस्त्यांची रचना करण्यात येणार आहे. तसेच, रस्ते ओलांडताना कोठेही वाहनचालकांना थांबावे लागणार नाही किंवा त्यात वाहतूक नियंत्रक दिवे नसतील. चारही दिशांच्या रस्त्यांलगत ‘सर्व्हिस रोड’ ठेवण्यात आले आहेत. निविदा मंजूर झाल्यावर कार्यआदेश (वर्कऑर्डर) दिल्यानंतर दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ‘एनएसआयए’चे नियोजन आहे.

पुलाच्या उभारणीसाठी ‘एनएचआयए’ला सुमारे १२ हेक्‍टर जमीन हवी आहे. त्या भागात महापालिका, वनविभाग आणि खासगी जमिनींचा त्यात समावेश आहे.  महापालिकेच्या माध्यमातून रोख मोबदला किंवा टीडीआरच्या माध्यमातून या जमिनींचे संपादन होणार आहे. तत्पूर्वी पुलामुळे किती जणांच्या जमिनी किंवा बांधकामे बाधित होणार आहेत, याची यादी तयार करण्याचे काम महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, महापालिका आणि हायवेचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत गेल्या महिन्यात ठरले होते. प्रकल्पबाधितांची यादी तयार करण्यासाठी महापालिका आणि एनएचआयएच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त सर्वेक्षण सुरू आहे. प्रत्येक रस्त्यानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात पाषाण रस्ता, एनडीए रस्ता, मुळशी रस्ता, भुसारी कॉलनी या चार रस्त्यांवरील सुमारे ६००-७०० मीटर रस्त्याचे पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण होणार आहे.

त्यातून प्रकल्पबाधितांची यादी तयार होईल. त्यानंतर महापालिका त्याबाबत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या दोन रस्त्यांचे सर्वेक्षण झाले असून, उर्वरित रस्त्यांचे येत्या पंधरा दिवसांत सर्वेक्षण होणार आहे. 

राजकीय पाठबळ असूनही विलंब
चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठी आमदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर आग्रही आहेत. खासदार अनिल शिरोळे यांनीही पुलाचे काम लवकर व्हावे, यासाठी प्रयत्न केले आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी उपलब्ध करून दिला. महापालिकेतही भाजपच सत्तेवर आहे. त्यामुळे एवढे राजकीय पाठबळ असूनही पुलाचे काम का रखडले आहे, असा नागरिकांचा सवाल आहे.

- पुलासाठी १२ हेक्‍टर जमीन हवी 
- खर्च ४२१ कोटी रुपये 
- २ वर्षांत काम करण्याचे नियोजन 
- १५ दिवसांत जमीन बाधितांचे सर्वेक्षण पूर्ण होणार