व्यावसायिक सिलिंडरच्या बिलांत घोळ!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

पुणे - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होऊन बारा दिवस झाले; मात्र अद्याप त्याबाबत व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम दूर झालेला नाही. त्याचा फायदा काही व्यावसायिक सिलिंडर पुरवठा करणाऱ्या वितरकांकडून (डीलर) घेतला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जीएसटी नंबर नसलेले बिल न देताच सवलतीच्या किमतीमध्ये या सिलिंडरचा पुरवठा वितरकांकडून केला जात आहे. परिणामी त्याचा तोटा संबंधित व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.

एक जुलैपासून केंद्र सरकारने देशभर जीएसटी लागू केला आहे. त्यामध्ये व्यावसायिक सिलिंडरवर १८ टक्के, तर घरगुती सिलिंडरवर पाच टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. वितरकांकडून व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा करताना संबंधित ग्राहकाला जीएसटीसह बिल देणे अपेक्षित आहे; मात्र शहरातील काही वितरक असे बिल न देताना सिलिंडरची जी किंमत आहे, त्यामध्ये पन्नास ते शंभर रुपये सवलत देऊन त्याचा पुरवठा करत आहेत. यामुळे व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांचे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. 

पुरवठा करण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या बिलावर जीएसटी नंबर नसल्यामुळे संबंधित व्यावसायिकाला ‘रिटर्न’ भरून त्याचा ‘सेटऑफ’ घेता येत नाही. परिणामी पन्नास ते शंभर रुपयांच्या सवलतीच्या मोबदल्यात जो ‘सेटऑफ’ मिळणार आहे, ती रक्कम विचारात घेतली, तर व्यावसायिकांचा तोटा होतो. तसेच संबंधित वितरक मात्र ‘अन्‌ रजिस्टर’ सेल दाखवून त्या नावाखाली ‘सेटऑफ’ घेतो. यावरून त्या वितरकांचा मोठा फायदा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी वितरकांकडून व्यावसायिक सिलिंडर घेताना त्या बिलावर जीएसटी नंबर असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन कंपन्यांकडून करण्यात आले आहे.