व्यस्त दिनक्रमावर "डोअरस्टेप सर्व्हिसिंग'चा पर्याय 

सलील उरुणकर
मंगळवार, 6 जून 2017

पुणे - धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, तर दुचाकीच्या "सर्व्हिसिंग'साठी वेगळा वेळ कसा काढणार? सर्व्हिस सेंटरला गाडी पोचवणे आणि पुन्हा ठराविक वेळेतच गाडी घ्यायला जाणे सर्वांनाच जमेल असे नाही. सर्वसामान्य नागरिकांची ही अडचण, विशेषतः आयटी प्रोफेशनल्सचा व्यस्त दिनक्रम लक्षात घेऊन "एमसेवा' या स्टार्ट अपने "डोअरस्टेप सर्व्हिसिंग' ही संकल्पना राबविली आहे. स्पेअर्स व सर्व्हिस डिलरशीपचा 15 वर्षांचा अनुभव पाठीशी असलेले सुशील बोरा यांनी वयाच्या पन्नाशीत हे सुरू केले. 

बोरा यांच्यासह अकाउंट्‌स, व्यवस्थापन विषयातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या सविता वांद्रे यांनी ऑक्‍टोबर 2015 मध्ये हे स्टार्ट अप सुरू केले असून सध्या शहरातील मोठ्या सोसायट्या आणि आयटी पार्कमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

"एमसेवा'विषयी माहिती देताना सविता म्हणाल्या, ""पुण्यासारख्या शहरामध्ये दुचाकींची संख्या अधिक आहे. सुरवातीला आम्ही वैयक्तिक ग्राहकांना सेवा पुरविण्याचा प्रयत्न केला; मात्र आर्थिकदृष्ट्या ते बिझनेस मॉडेल परवडणारे नव्हते. ऐनवेळी निर्णय बदलणाऱ्या, अनुपलब्ध असणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक होती. त्यामुळे आता आम्ही फक्त कॉर्पोरेट कंपन्या आणि मोठ्या सोसायट्यांमध्येच ही सेवा देत आहोत. सोमवार ते शुक्रवार आयटी पार्कमध्ये, तर शनिवारी आणि रविवारी दिवसभर सोसायट्यांच्या आवारामध्ये आमची अत्याधुनिक व सुसज्ज व्हॅन उभी असते. सध्या दिवसाला पंधरा ते वीस गाड्यांच्या देखभालीचे काम पूर्ण केले जात आहे व अशाप्रकारे आतापर्यंत आम्ही पाच हजारांहून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे.'' 

"एमसेवा'कडे सध्या दहा कर्मचारी आहेत. अद्याप आम्ही फंडिंगसाठी गुंतवणूकदारांकडे प्रस्ताव दिलेला नाही; मात्र लवकरच अन्य शहरांमध्ये सेवा विस्तारण्याचा आणि गुंतवणूक मिळविण्याचा मानस आहे. 
- सुशील बोरा, संस्थापक, एमसेवा 

एमसेवा 
- सुशील बोरा व सविता वांद्रे यांनी ऑक्‍टोबर 2015 मध्ये स्थापन केलेले स्टार्ट अप 
- शंभरहून अधिक ठिकाणी वाहन देखभालीचे कॅंप, पाच हजार ग्राहकांना सेवा 
- बिझनेस, आयटी पार्क, सोसायट्यांमध्ये सेवा 
- गुंतवणूक मिळण्याच्या प्रतीक्षेत