अलिप्ततावादाचे धोरण भारताने बदलावे - सी. राजा मोहन

अलिप्ततावादाचे धोरण भारताने बदलावे -  सी. राजा मोहन

पुणे - ""जग झपाट्याने बदल चालले आहे. जागतिक सत्तास्थानांतही त्याच वेगाने स्थित्यंतरे घडू लागली आहेत. अशावेळी भारतानेही स्वतःमध्ये काही मूलभूत घडविणे आवश्‍यक ठरणार आहे. एकेकाळी भारताने आलिप्ततावादाचे धोरण स्वीकारले होते. मात्र सध्याच्या काळात अलिप्त राहण्यात भूषणावह काही नाही. स्वतःला अलिप्त म्हणवण्यात न रमता, गरजेनुसार त्यात बदल घडवल्यास आपले भविष्य उज्ज्वल असू शकेल, असे स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय नातेसंबंध आणि परराष्ट्र धोरणांतील तज्ज्ञ सी. राजा मोहन यांनी आज येथे व्यक्त केले. 

""व्यावहारिकदृष्ट्या आवश्‍यकतेनुसार परराष्ट्र धोरणात्मक पातळीवर काही देशांसोबत एकत्र येण्यात चुकीचे काही नाही. किंबहूना, सत्ताकेंद्र होण्यासाठी तेच गरजेचे आहे,'' असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. 

जागतिक राजकारणाचे केंद्रस्थान हिंदी महासागर व अग्नेय आशियाकडे सरकत असतानाच इस्लामिक दहशतवाद व चीनकडून राबविण्यात येत असलेले आक्रमक परराष्ट्र धोरण, या दोन घटकांचा प्रभाव वाढतो आहे. भारतीय परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनातून या दोन मोठ्या आव्हानांच्या पार्श्‍वभूमीवर "पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्‍युरिटी' (पीडीएनएस) या परराष्ट्र धोरण व व्यूहात्मक राजकारण तज्ज्ञांच्या उच्चस्तरीय परिषदेच्या उद्‌घाटनावेळी राजा मोहन बोलत होते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, "पीआयसी'चे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, "पीडीएनएस'चे निमंत्रक एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले आदी उपस्थित होते. "पुणे इंटरनॅशनल सेंटर'तर्फे आयोजित या परिषदेसाठी "सकाळ माध्यम समूह' माध्यम प्रायोजक आहे. 

राजा मोहन म्हणाले, ""जागातिक सत्ता आणि सत्तेचा विस्तार सध्या भिन्न रूपांत पाहायला मिळत आहे. यात पहिला धक्का अमेरिकेच्या हुकमी आणि एकमेवाद्वितीय अशा "महासत्ता'स्थानाला बसला आहे. "एकीकडे एकटा अमेरिका आणि दुसरीकडे उर्वरित जग'; असे समीकरण आता राहिलेले नाही. अमेरिकेचे ते अढळपद कधीच ढळायला सुरवात झाली असून, त्याला चीनने स्पर्धा निर्माण केली आहे. त्यामुळे सध्याचे जग एका अस्थिर टप्प्यातून जात आहे. जागतिक संदर्भात असणारी विविध देशांची सत्तास्थानांच्या आनुषंगाने जी रचना (वर्ल्ड ऑर्डर) गेली पंचवीस-तीस वर्षे टिकून होती, त्यात आता आमूलाग्र बदल होण्यास सुरवात झाली आहे.'' 

ही दिवास्वप्नं कालौघात भंगली ! 
अमेरिकेच्या एकध्रुवीय सत्ता केंद्राला इतर देशांकडून मिळालेली स्पर्धा, गेल्या पंचवीस वर्षांत विविध देशांच्यात कमी होत गेलेली सद्‌भावना, जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणातून पुढे आलेल्या अनेक जागतिक समस्या, भांडवलशाहीचे बदलत गेलेले रूप, इंटरनेटच्या आगमनानंतरही सर्वसामान्यांच्या "स्वतंत्र' आवाजाला लागत गेलेली कुलपे, अशा अनेक दिवास्वप्नांना आपण भंगताना पाहिले आहे. अशावेळी आपल्या भू-राजकीय धोरणांचा विचार नव्याने करण्याची गरज आहे. शिवाय, बदलत्या तंत्रज्ञानाशी स्पर्धा करण्यास आपण सिद्ध असण्याचीही आवश्‍यकता आहे, असे राजा मोहन यांनी सांगितले. 

""विकासाची गती थांबली, तर देशात अस्थिरता येऊ शकते. पण जर देशातील संस्थात्मक बांधणी कणखर आणि मजबूत असेल, तर अस्थिरतेतही पाय रोवून उभे राहता येऊ शकते. विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे. आज नकारात्मक शक्ती आपले उपद्रवमूल्य वाढवत नेण्यात तंत्रज्ञान या दुधारी अस्त्राचा उपयोग करून घेत आहेत. अशावेळी हॅकिंग, सायबर क्राइम या गोष्टींना आता सहज सोप्या मानून चालणारच नाही. जेनेटिक इंजिनियरिंग सारख्या तंत्रज्ञानामुळे आता कुणाहीकडे संहारक आयुधे येऊन पोचली आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेकडे अधिक सजगपणे पाहायला हवे,'' असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com