कॅंटोन्मेंटचा उत्सवी स्पॉट ‘एमजी’ रस्ता

नागराज नायडू
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

ठिकठिकाणी चित्र रंगविणारी मुले... एकांत जागी बसलेले ज्येष्ठ नागरिक... डीजेच्या तालावर ठेका धरणारी व एकमेकांची चेष्टा मस्करी करणारी तरुणाई... मिकी माउस, नॉडी यांसारख्या कार्टूनची वेशभूषा केलेले कलाकार... जंपिंग जॅक, उंच काठ्यांवर उभे राहून चालणारे कलाकार... घोडे व उंटावरील रपेटी... काय पाहाल अन्‌ काय नाही!

एरवी वाहनांनी गजबजणारा एमजी रस्ता २५ आणि ३१ डिसेंबर रोजी यात्रेचे रूप धारण केलेला असतो. ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टनिमित्त आयोजित कार्यक्रमांत मजेत चाला, गप्पा मारा, मनसोक्त हसा, कार्टून्सबरोबर धमाल करा, नाही तर डीजेच्या धूनवर मस्त डोला. चालू वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी २५ (ख्रिसमस- नाताळ) ते ३१ डिसेंबरदरम्यान महात्मा गांधी (एमजी) रस्त्याला यात्रेचे स्वरूप आलेले असते. ३१ डिसेंबर रोजी तर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातो. 

२५ आणि ३१ डिसेंबर रोजी या रस्त्यावर निनावी जत्राच असते. या दोन दिवशी डॉ. आंबेडकर चौकातून एमजी रस्त्यावर जाणारी वाहने बंद करण्यात येतात. तारापूर रस्ता आणि एमजी रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये पार्किंगसाठी जागा ठेवण्यात येते.

महात्मा गांधी रस्त्याला ब्रिटिशकालीन इतिहास आहे. इंग्रज गेले तरी त्यांची भाषा, चालीरीती आणि संस्कृतीचा सुंगध या परिसरात अद्याप दरवळत आहे. लष्कर परिसरात आजही पाश्‍चात्त्य सण मोठ्या थाटात साजरे केले जातात. सगळीकडेच फन फेअर!

जल्लोष करून भूक लागली तर काळजी करण्यासारखे नाही. कारण जवळच महानाज रेस्टॉरंटमध्ये समोसा आहे. कयानी बेकरीचा केक आहे. फिरता फिरता बुधानीचे वेफर्स खा, नाही तर कराची स्वीटची मिठाई घ्या! कॉफीबरोबर ट्रायलक आणि कोहिनूर हॉटेलचा चीज बटर टोस्ट चाखा. जेवायचेच असेल, तर डायमंड हॉटेलची बिर्याणी आहेच! आणि नंतर आइस्क्रीमसाठी मार्जोरीनपासून अनेक पार्लर आहेत.