महापालिकेकडून ‘कॅव्हेट’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

मित्रमंडळ चौकातील भूखंडाप्रकरणी १४ जुलैला सुनावणी

पुणे - मित्रमंडळ चौकातील नऊ एकर भूखंडावरील अतिक्रमण हटविण्याबाबतच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान परस्पर निर्णय होऊ नये म्हणून महापालिकेने शुक्रवारी न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल केले. या प्रकरणी १४ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. 

मित्रमंडळ चौकातील नऊ एकर भूखंड आपल्या मालकीचा असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र, मूळ जागामालकातर्फे विकसक सूर्यकांत काकडे यांनी हा भूखंड महापालिकेच्या मालकीचा नसून आमच्या मालकीचा आहे, असा दावा केला आहे. तसेच सुमारे तीन महिन्यांपूर्वी भूखंडाचा ताबा घेऊन त्यावर कुंपण उभारले आहे. हे कुंपण उभारणे म्हणजे न्यायालयाने ‘जैसे थे’ दिलेल्या आदेशाचा अवमान आहे, अशी याचिका महापालिकेने न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी होती. दरम्यान, भूखंडाच्या प्रॉपर्टी कार्डवरील मालकाचे नाव वगळण्याचा आदेश नगर भूमापन अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिला आहे. त्यामुळे या भूखंडाच्या प्रॉपर्टी कार्डवर आता महापालिकेचे नाव कायम राहणार आहे. महापालिकेच्या वकिलांनी या आदेशाची माहिती न्यायालयात शुक्रवारी सादर केली. तसेच अवमान याचिकेच्या सुनावणीदरम्यान महापालिकेच्या अपरोक्ष निकाल देऊ नये, कोणताही निकाल द्यायचा असेल तर, महापालिकेला बाजू मांडण्याची संधी द्यावी, या मागणीसाठी ‘कॅव्हेट’ दाखल केले आहे, अशी माहिती महापालिकेतील विधी अधिकारी ॲड. निशा चव्हाण यांनी दिली. दरम्यान, या भूखंडावर विकसक सूर्यकांत काकडे यांनी केलेले अतिक्रमण महापालिकेने त्वरित काढावे, अशी मागणी नगरसेवक आबा बागूल यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना भेटून केली.