अपघाताचा चांदणी चौक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

चौकातील वाहन संख्या (२४ तासांतील)
१ लाख चांदणी चौक 
८५ हजार हिंजवडी परिसर
७५ हजार वारजे माळवाडी
५० हजार पुणे- सातारा रस्ता
(स्रोत- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण)

कोथरूड - चांदणी चौकात तीव्र उतार असल्याने वारंवार अपघात होत आहेत. शुक्रवारी सकाळी येथे झालेल्या अपघातामुळे एका महिलेचा आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. 

त्यामुळे या चौकातील गेल्या पाच वर्षांमधील अपघातांमधील बळींची संख्या २५ च्या वर गेली आहे. दरम्यान, या अपघातामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.  शहराचे पश्‍चिम प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकामध्ये वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच झाली आहे. शुक्रवारी सकाळी चांदणी चौकातील तीव्र उतारावर पुन्हा एकदा अपघात घडल्याने पौड रस्त्यावर भूगावपर्यंत आणि कात्रज -देहू  बाह्यवळण मार्गावर वारजे माळवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिक त्रस्त झाले.

तीव्र उतारावर बहुसंख्य अपघात 
कोथरूड पोलिस ठाणे, वारजे पोलिस ठाणे आणि हिंजवडी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चांदणी चौकाच्या परिसरामध्ये गेल्या पाच वर्षांमधील विविध अपघातांमध्ये पंचवीसहून अधिक व्यक्तींचा बळी गेला आहे. यातील बहुसंख्य अपघात हे चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या लोहिया जैन आयटी पार्कजवळील तीव्र उतारावर झाले आहेत. चार वर्षांपूर्वी ‘सकाळ’ ने पाठपुरावा केल्यानंतर चांदणी चौकातील दोन्ही बाजूचे तीव्र उतार कमी करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना केल्या. मात्र कोथरूडकडे येणाऱ्या रस्त्यावरील तीव्र उतार कमी करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. हेच वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सिद्ध होत आहे.

अपघाताची घटना अत्यंत 
दुर्दैवी असून, असे अपघात होऊ नये. यासाठी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठी केंद्राने निधी मंजूर केला आहे. लवकरच या पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे.
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती 

महापालिका अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे चांदणी चौकातील काम रखडले आहे. तातडीने हे काम सुरू करून चांदणी चौक अपघातमुक्त करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तत्पूर्वी चांदणी चौकातील तीव्र उतार कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.  
- अल्पना वर्पे, स्थानिक नगरसेविका

आयुक्तांवर गुन्हा दाखल करा : मनसे 
महापालिका प्रशासनाने चांदणी चौकातील वाहतूक समस्येबाबत उपाययोजना करण्यात दिरंगाई केली आहे. या अपघाताला महापालिका आणि आयुक्त कुणाल कुमार जबाबदार आहेत, असा आरोप मनसेचे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांनी केला. त्यांनी या संदर्भात कोथरूड पोलिस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ फुगे यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

शनिवार, रविवार सुट्ट्यांच्या दिवशी मुळशी, लवासा, लोणावळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक जातात. त्यामुळे गर्दी होते. या ठिकाणी दररोज सकाळी तीन कर्मचारी नेमलेले असतात. गर्दीच्या वेळी अधिकारी, दोन जादा कर्मचारी नेमावे लागतात. येथील पुलाचे काम सुरू करताना आम्ही येथे वाहतूक विभागाचा अधिकारी आणि जादा कर्मचाऱ्यांची मागणी करणार आहोत. याचबरोबर ठेकेदाराचे वॉर्डन येथे लागणार आहेत. 
- अनिल कलगुटकर, पोलिस निरीक्षक, वारजे माळवाडी वाहतूक विभाग

दुपारी चार ते रात्री अकरापर्यंत गर्दी
चांदणी चौकात दररोज सकाळी कात्रज, कोथरूड, मुळशी मार्गे येणारी वाहतूक असते. महामार्गावरून येणारी वाहतूक वेगळी असते. दुपारी चार ते रात्री अकरापर्यंत वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. तेव्हा वाहतुकीचा वेग मंदावतो. या वेळी हिंजवडी, मुळशी व पाषाण मार्गेही वाहतूक कोथरूडमधून शहरात जात असते. त्यामुळे या चौकात एकच कोंडी होते. 

पुलाच्या निविदांना मुदतवाढ
चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठी ‘एनएचएआय’ने निविदा तयार केल्या आहेत. त्या राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धही करण्यात आल्या. त्यासाठी आठ कंपन्यांनी उत्सुकता दर्शविली आहे. परंतु, भूसंपादनाची प्रक्रिया रखडली असल्यामुळे निविदांची मुदत वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. 

थोडक्‍यात वाचले...
कोथरूड -
‘‘आम्ही वारजेमधून सहाआसनी रिक्षाने चांदणी चौकापर्यंत प्रवास करत आलो. चांदणी चौकामध्ये उतरल्यानंतर आम्ही रस्ता ओलांडून उतारावरून खाली येत असताना वेगाने येणाऱ्या डंपरच्या दरवाजाने मला धडक दिली. प्रसंगावधान राखून मी रस्त्यालगतच्या खांबाला पकडल्याने वाचले. मात्र माझ्या सोबतच थोड्या अंतरावर चालत असलेल्या चार जणांना डंपरने जोरदार धडक दिली आणि त्यांना फरफटत पुढे नेले,’’ असे सांगत होती बचावलेली तरुणी पूजा काशिनाथ भालके. अपघातात पूजा चव्हाण यांचा मृत्यू झाला. त्यांची ही मैत्रीण होती. पूजा म्हणाली, ‘‘आम्ही एकाच आयटी कंपनीमध्ये काम करीत आहोत. सकाळी रिक्षाने वारजेतून चांदणी चौकामध्ये उतरल्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. 

बघ्यांची गर्दी; पण मदतीला कोणी नाही 
पौड रस्ता -
प्रत्यक्षदर्शी बंटी सातपुते व दीपक कुडले म्हणाले, ‘‘आम्ही भूगाववरून कोथरूडला निघालो होतो. सकाळी नऊ वीसच्या सुमारास ही घटना घडली. दोन महिला मुलीला शाळेत सोडवायला पायी निघाल्या होत्या. डंपरने पायी निघालेल्या या तिघांना उडवले. यातील एक महिला जोरात उडून पोलला धडकली. तिच्या शरीरातील आतडे बाहेर पडले. लहान मुलीच्या पायाचा चेंदामेंदा झाला. दोघींची स्थिती गंभीर होती. एका महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. ते दृश्‍य बघवत नव्हते. बघ्यांची गर्दी झाली; पण एकही मदतीला पुढे येत नव्हते. एका इको गाडीत आम्ही सर्वांना ठेवले. त्या ड्रायव्हरने आणखी एका गाडीला धडक दिली होती. सुदैवाने त्यातील लोकांना फारसे लागले नाही.’’